धाराशिव – समय सारथी
धार्मिक आणि सामाजिक परंपरांना महत्त्व देत समाजात शिस्त, शांतता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शहरातील कोणत्याही कार्यक्रमात डीजे, डॉल्बी किंवा बँजो वाजवायचा नाही, असा ठाम निर्धार समाजाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. केवळ एखाद्या कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, सर्व कार्यक्रमांमध्ये या वाद्यांचा वापर टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर समाजाने असा निर्णय घेऊन अनुकरण करणे काळाची गरज आहे.
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे.) दर्गा येथे 13 ऑक्टोबर रोजी ही बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील उलेमा, मौलाना, सामाजिक नेते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना डीजे, डॉल्बी आणि बँजोच्या वापराचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर या वाद्यांना कार्यक्रमांमधून पूर्णपणे वगळण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
आज अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये या वाद्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, धाराशिवमधील मुस्लिम समाजाने या प्रथेला नकार देण्याची भूमिका घेतली आहे. कोणताही कार्यक्रम, उत्सव किंवा सामाजिक आयोजन असो, त्यामध्ये डीजे, डॉल्बी आणि बँजो वाजवायचा नाही, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.
या भूमिकेमागे केवळ वाद्यांचा वापर थांबविणे एवढाच उद्देश नसून, समाजातील धार्मिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि इतर नागरिकांच्या अडचणींचा विचार करण्याची भावना असल्याचे बैठकीत सर्वानुमते मांडण्यात आले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या निर्णयाचे पालन करावे आणि सामूहिकरीत्या घेतलेल्या भूमिकेला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
डीजे, डॉल्बी आणि बँजोच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे समाजातील कार्यक्रम साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. दारू पिऊन गोंधळ घालणे, नाचगाण्याच्या नावाखाली इतरांना त्रास देणे किंवा सामाजिक शांतता बिघडविणारे वर्तन करणे, अशा बाबींना धार्मिक मूल्यांच्या दृष्टीने विरोध असल्याची भूमिका मांडण्यात आली. समाजाने स्वतःहून काही नियम स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करावी आणि समाजापुढे आदर्श ठेवावा, असे आवाहन केले.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्याच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास नमाज-ए-जनाजामध्ये सहभागी न होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाने घेतलेला हा निर्णय सामाजिक शिस्त आणि सामूहिक निर्णयाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो. एखादी प्रथा समाजासाठी योग्य आहे की नाही, याचा विचार करून समाजातील जबाबदार व्यक्तींनी एकत्र येऊन भूमिका घेणे ही सामाजिक परिवर्तनाची एक दिशा ठरू शकते, अशी प्रतिक्रिया बैठकीला उपस्थित प्रतिष्ठित नागरिकांनी दिली.












