धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टी असो की दुष्काळ कोणतीही नैसर्गिक आपत्ती संकट आले की राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येतात हे वास्तव आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या दुष्काळाचे भीषण संकट असुन शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी कीट देणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांनाही दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने दिवाळी किट तयार करण्यात आले आहे. या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय यांसह विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी शिवसैनिक सक्रिय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेले हे दिवाळी किट धाराशिव जिल्ह्यातील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख कार्यरत राहणार आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी मोठ्या संकटात सापडले आहेत. या कठीण परिस्थितीत बळीराजाच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचला पाहिजे. शेतकरी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे, हीच आपली भावना आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या सणात दिलासा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मदतीचा हात मिळणार आहे. यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











