संकट काळात बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं बांधिलकी – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
धाराशिव – समय सारथी
दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘आनंदाचा शिधा’ घेऊन ट्रक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रवाना झाले. संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं, हीच शिवसेनेची बांधिलकी असे म्हणत शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली.
दिवाळी म्हणजे घराघरांत दिव्यांचा लखलखाट आणि आनंदाचा सण पण दुष्काळाच्या संकटाशी झुंजणाऱ्या बळीराजाची दिवाळीही गोड व्हावी, त्याच्या घरातही आनंदाचे दिवे उजळावेत, यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिध्याने भरलेल्या ट्रकना भगवा ध्वज दाखवून रवाना करण्यात आले.
हा केवळ शिधा नसून, संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभं असल्याचा विश्वास आहे; त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या आपुलकीचा आणि माणुसकीच्या नात्याचा हा भावनिक धागा आहे. शेतकऱ्यांच्या घरातही दिवाळीचा गोडवा पोहोचावा, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलावं आणि त्यांच्या मुलांच्या डोळ्यांत आनंद चमकावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे असे सरनाईक म्हणाले.
आनंदाचा शिधा या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय यांसह विविध वस्तू असतील. हे किट धाराशिव जिल्ह्यातील गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख कार्यरत राहणार आहेत. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यासह टीमने याकडे लक्ष देत नियोजन केले आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत अश्या स्तिथीत हे कर्तव्य शिवसेना करीत आहे.
ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आहे. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, या शब्दांत त्यांनी बळीराजाला दिलासा देत मदतीचा निर्धार व्यक्त केला.सणाचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे, विशेषतः संकटात असलेल्या आपल्या बळीराजाच्या घरापर्यंत.. हाच विचार घेऊन शिवसेना सदैव शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभी आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबांना केवळ तात्पुरता दिलासा नव्हे, तर स्वावलंबनाची संधी मिळावी, यासाठी 25 हजार शिलाई मशीन महिलांना आणि 25 हजार सायकली मुलींना देण्याची घोषणा शिंदे यांनी केली. शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची आणि मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली.
“आम्ही आरोपांना आरोपांनी नव्हे, तर कामातून उत्तर देणार,” असं स्पष्ट करत शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या घरची चूल पेटती ठेवणं आणि त्यांच्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढणं हेच महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत, संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणं हीच शिवसेनेची भूमिका आहे. सण उत्सवांचा आनंद साजरा करताना संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या घरातही आनंद पोहोचला पाहिजे, हा विचार शिंदे यांनी मांडला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, नगरसेवक दीपक वेतकर, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.











