मुंबईला चकरा, नेत्यांच्या गाठी भेटी – कला केंद्र सुरु करण्यासाठी लॉबिंग, पाठबळ कोण देणार ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र परवाने कायम स्वरूपी रद्द करून काही कला केंद्र सील केले असले तरी काही ठिकाणी छमछम सुरु आहे का असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. कालिका कला केंद्रच्या मालकीण निर्मला मोहन जाधव यांच्या विरोधात एका नर्तीका महिलेने थेट छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे टपालाद्वारे तक्रार अर्ज सादर केला आहे. जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक व 15 लाखांच्या बदनामीची पोस्ट असे तक्रारीचे स्वरूप आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी पाहणी व धाडी टाकत अनेक धक्कादायक बाबी व नियमभंग झाल्यानंतर सुनावणी अंती जिल्ह्यातील तुळजाई, कालिका, महाकाली, पिंजरा, गौरी व साई ही 6 कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करीत काही केंद्राला सील ठोकले. कला केंद्र पुन्हा सुरु व्हावे यासाठी काही राजकीय गाव पुढारी नेतृत्वाकडे साकडे घालीत असुन मुंबईला चकरा मारीत नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. कला केंद्र सुरु करण्यासाठी लॉबिंग सुरु असतानाच कालिकाची तक्रार धडकली आहे.
कालिका कला केंद्रात काम देण्याचे आमिष दाखवून बीड येथील एका 20 वर्षीय महिलेलाविश्वास संपादन करून उचल देऊन बोलावून घेतले, त्यानंतर तिथे गेल्यावर जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली. तसेच उचल परत घेऊन बदनामी करण्याच्या उद्देशाने 24 ऑगस्ट रोजी सदरील महिला 15 लाख रुपये घेऊन पळून गेली अशी बदनामीकारक पोस्ट महिलेच्या नाव व फोटोसह प्रसारित केली, असा गंभीर आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.
कालिका कला केंद्रचा परवाना रद्द केलेले असताना हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील कला केंद्र सील केल्याचा व सद्य स्तिथीचा आढावा घेणे गरजेचे आहे. कला केंद्र बंद असतानाही काही ठिकाणी छुपी छमछम व काही लॉजवर खासगी बैठका सुरु असल्याची चर्चा आहे.
यापुर्वी देखील काही कला केंद्रातील महिलांचे शारीरिक व लैंगिक शोषण, जबरदस्तीने त्यांना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचे व बळजबरीने धर्मातर केल्याचे प्रकार घडले असुन गुन्हे सुद्धा नोंद झाले आहेत. काही ठिकाणी जीवघेणे हल्ले, गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कला केंद्र बंद झाल्याने त्या भागातील महिला, ग्रामस्थ यात समाधान व्यक्त होत असतानाच काही गाव पुढारी ते सुरु करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.











