धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील बावी, धारूर या ठिकाणी मंगळवारी गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी आमदार कैलास पाटील यांनी केली. केळी, आंबा बागा ,ज्वारी व इतर पिकांच प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आ पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी गारपीठ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी गारपीठ होऊन पिकांचे नुकसान होत आहे. अशाच प्रकारे मंगळवारी झालेल्या गारपिटीमुळे धाराशिव तालुक्यातील धारूर,बावी, खामसवाडी यासह कळंब येथील देवळाली, कोल्हेगाव, ढोराळा आदी परिसरामध्ये गारपिठीने अक्षरशः शेतकऱ्याचे पिक वाया गेलेले दिसत आहे. या गावांमध्ये आमदार कैलास पाटील यांनी भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली शिवाय या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याचे आदेश पाटील यांनी दिले आहेत.
पाटील यांनी पिकांचा उत्पादन खर्च हा कित्येक लाखात असतो व मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी असून त्याने शेतकऱ्याचे नुकसान कसंच भरून येत नाही. मदत वाढवून देणे अपेक्षित आहे पण किमान आहे ती मदत तरी वेळेत मिळावी अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी सरकारकडे केली आहे. शेतकरी अत्यंत धाडस करून वेगळे प्रयोग करून अशा पिकांची लागवड करतो त्यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्यावर आलेले मोठे संकट दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. अन्यथा शेतकरी अशा प्रकारचे पीक घेण्याचे धाडस करणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकारने करावे अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
यावेळी तहसिलदार मृणाल जाधव, तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाणे, उप अभियंता प्रकाश मोरे, शिवसेनेचे अंकुश मोरे, गजेंद्र जाधव, बालाजी गुरव, धारुरचे सरपंच बालाजी पवार यांच्यासमवेत शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.











