धाराशिव – समय सारथी
कृषी निविष्ठा घोटाळा, वेतन अपहार, शेडनेट योजनेतील अनियमितते नंतर नियमबाह्य सेवा वर्ग झाल्याचा प्रकार चौकशी अहवालातून समोर आला आहे. तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्यासह तालुका कृषी अधिकारी महेश देवकाते व भागवत सरडे हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ लिपीक नंदकिशोर कदम व अनिल सुर्यवंशी यांची नियमबाह्य रित्या सेवा वर्ग केल्याची तक्रार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर वारे यांनी केली होती.
कृषी विभागातील स्टार कर्मचारी कदम व सुर्यवंशी यांचा संपर्क, योगदान आणि नियोजन कौशल्य असल्याने त्यांना विशेष मागणी होती. 2 लोकप्रतिनिधी यांनी कृषी आयुक्त यांना फोनद्वारे व पत्रव्यवहार करून सेवा वर्ग रद्द करू नये असे कळविल्याचे अहवालात नमुद केले आहे. पुढाऱ्यांच्या मनावर कार्यालय चालते का? असा प्रश्न उपस्थितीत होत असल्याचे कृषी आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ प्रशासन अधिकारी ज्ञानचंद गित्ते यांच्या पत्रात नमुद आहे.
विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला होता मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही. तक्रार व चौकशी अहवाल नंतर कदम व सूर्यवंशी हे मुळ पदस्थापनेवर हजर झाले. अनियमिततेस जबाबदार असलेल्या सरडे व देवकाते यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील कलम 3 चा भंग केला म्हणुन प्रशासकीय कारवाईची शिफारस केली आहे. माने यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
भ्रष्टाचार करा, पकडले गेल्यास आर्थिक वसुलीची कारवाई, पैसे भरा आणि दोषमुक्त व्हा असा काहीसा नियम बनला असुन धाराशिव कृषी विभागाच्या या विविध घोटाळ्यात फौजदारी गुन्हे नोंद करून निलंबन, बडतर्फीची कडक व सुचक कारवाई होणे गरजेचे आहे.












