धाराशिव – समय सारथी
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी सलमान पाशूमिया शेख (शालीमार कॉलनी, धाराशिव) याला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली, त्यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद याच्या आधारे कोर्टाने शिक्षा सुनावली.
फिर्यादी कलाम तमीज शेख (वय 45, रा. शालीमार कॉलनी, धाराशिव) हे व्यवसायाने वाहनचालक आहेत. फिर्यादीचा भाऊ जहांगिर आणि आरोपीचे वडील पाशूमिया शेख यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. याच वादातून आरोपीच्या वडिलांनी 1 वर्षापुर्वी जहागिर याच्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली होती.
29 ऑक्टोबर 22 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास फिर्यादी एमआयडीसी पुलाखाली कपडे विक्री करणाऱ्या आपल्या मामाकडे गेले होते. तेथे गप्पा मारत असताना आरोपी सलमान शेख याने पाठीमागून येऊन चाकूने फिर्यादीच्या डोक्यात व बरगडीवर वार केले त्यानंतर पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरोपीचा हात पकडल्याने चाकू त्यांच्या जबड्याला लागला. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या कलीम शेख यालाही चाकू लागून दुखापत झाली.
जखमींना रिक्षाचालक ज्ञानेश्वर कोळगे यांच्या रिक्षातून पल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 307,324 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक सी. एस. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. शासकीय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या प्रकरणात महिला पोलीस अंमलदार सी. बी. तर्फेवाड यांनी मदत केली.











