महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा – अभियानाचा दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा आधार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेले बळीराजा नवचेतना अभियान आता संपूर्ण राज्यात राबवले जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोरखेडा (ता. धाराशिव) येथील कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होऊन ही घोषणा केली. त्यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या या अभियानाचे कौतुक केले.
धाराशिव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या संकल्पनेतून बळीराजा नवचेतना अभियान राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन गावांमध्ये या अभियानांतर्गत उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतःहून अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार बुधवारी रात्री आठ वाजता बोरखेडा येथील कार्यक्रमात त्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला.
यावेळी तहसीलदार डॉ. जाधव यांनी सुरुवातीला अभियानाची माहिती सांगितली. अभियानाच्या माध्यमातून पाणीटंचाई, चारा टंचाई, शेतकऱ्यांचे समुपदेशन तसेच अन्य उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारले.
यानंतर बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यात सर्वत्र महाभयंकर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. या बळीराजा नवचेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम होत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरत आहे. यामुळे हे अभियान आता राज्यस्तरावर राबवण्यात येणार आहे. तहसीलदार जाधव यांनी पुढाकार घेऊन असा उपक्रम राबवणे ही प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
निश्चितच, येणाऱ्या काळात या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर होऊन त्यांना दुष्काळाशी लढण्याचे बळ मिळेल. यामुळे शेतकरी आत्महत्यांसारखे दुर्दैवी प्रकार होणार नाहीत. शासन आणि प्रशासन आपल्या पाठीशी आहेच. शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात; मात्र, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळेच आता धाराशिव तालुक्याच्या धर्तीवर हे अभियान संपूर्ण राज्यात राबवण्याचे आम्ही निश्चित केले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्यासह अपर तहसीलदार श्रद्धा चव्हाण, नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांच्यासह मंडल अधिकारी मेघा जांभळदरे, ग्राम महसूल अधिकारी राजेश पडवळ, अझर अत्तार, गणेश मुंडे, संदीप जगदाळे, रविकांत कदम आदींनी सहभाग नोंदवला.
धाराशिवच्या अभियानाप्रमाणे एसओपी ठरणार
बळीराजा नवचेतना अभियानामध्ये महसूल, पंचायत, कृषी व अन्य सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची विशिष्ट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना कामे वाटून देण्यात आली आहेत. यामुळे अभियानासाठी एक उत्कृष्ट एसओपी तयार झाली आहे. याच एसओपीचा वापर राज्यभरात अभियान राबवण्यासाठी करण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदार जाधव यांच्याकडून अभियानाचे सर्व अहवाल आणि त्यातील संपूर्ण बारीकसारीक बाबींचा आढावा महसूल मंत्री बावनकुळे यांनी मागवून घेतला आहे.
अभियान म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे
मंत्री बावनकुळे यांना माहिती देताना तहसीलदार डॉ. जाधव यांनी सांगितले की, हे अभियान म्हणजे केवळ एक दिवस कार्यक्रम घेणे नव्हे, तर कार्यक्रमानंतर प्रत्येक ग्रामस्तरावर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येतात. त्यांच्या दैनंदिन कामासोबतच दुष्काळात दिलासा देण्यासाठी जबाबदारी पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळ काळात ही सर्व यंत्रणा कार्यरत असेल, अशी योजना तयार करण्यात आली आहे.
वैफल्यग्रस्तांचा शोध आणि समुपदेशन
दुष्काळातील अडचणींमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करत त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भक्कम योजना तयार केली असल्याचे तहसीलदार डॉ. जाधव यांनी मंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. या नियोजनाचे बावनकुळे यांनी कौतुक केले. तहसील कार्यालयाला या संदर्भात आणखी काही मदतीची गरज असेल, तर शासनाकडून थेट मदत दिली जाईल. माझ्याकडे दुष्काळ आपत्ती निवारण समितीच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी आहे. यामुळे सर्व प्रकारची मदत माझ्याकडून शेतकरी व प्रशासनाला केली जाईल, अशी ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.











