चीनमध्ये 18 वर्षांखालील एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी
सुयशची जागतिक भरारी, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अभिनंदन
धाराशिव – समय सारथी
चीनमधील जिंगशान येथे झालेल्या पाचव्या जागतिक ज्युनिअर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये धाराशिवच्या सुयश आडे याने मुलांच्या १८ वर्षांखालील एकेरी गटात रौप्यपदक पटकावून भारताला या स्पर्धेच्या इतिहासातील पहिले पदक मिळवून दिले. पहिल्याच जागतिक स्पर्धेत त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्याचे अभिनंदन केले.
सुयश हा धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील तांड्यावरील रहिवासी असून, रुईभर येथील जयप्रकाश विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील संजय आडे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत, तर आई सुनीता या गृहिणी आहेत सामान्य कुटुंबातून आलेल्या सुयशने जागतिक स्तरावर मजल मारत धाराशिवसह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच सुयश धाराशिव जिल्हा क्रीडांगणावर नवोदित खेळाडूंना सॉफ्ट टेनिसचे प्रशिक्षणही देतो. स्वतःच्या प्रगतीसोबतच नव्या खेळाडूंना घडविण्याचा त्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुयशला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी विशेष प्रयत्न केले होते. चीन दौऱ्यापूर्वी त्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. सुयशच्या यशामुळे धाराशिवच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळातही तो देशासाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट
भारतीय सॉफ्ट टेनिस साठी अभिमानाचा क्षण कारण सुयश आडे ने चीनमधील जिंगशान येथे 5 व्या जागतिक ज्युनिअर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये मुलांच्या-18 एकेरीमध्ये भारताला सिल्वर मेडल जिंकून दिले आहे. यापूर्वी या स्पर्धेत कधी भारताला मेडल मिळाले नाही.सुयश आडे यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.आपल्या दृढ निश्चय जिद्द ,मेहनत,चिकाटी, कौशल्याने आणि लढवयाने देशाला अभिमान वाटावा असं यश संपादन केले आहे. अभिनंदन सुयश आडे











