धाराशिव – समय सारथी
कळंब येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी लखन गायकवाड याला कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. पोलिसांनी वेळेत चार्ज शीट अर्थात दोषारोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला जामीन मिळाला आहे, दोषारोप पत्र दाखल न केल्याने आरोपीना जामीन मिळाला असुन कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. 50 हजार रुपयांच्या व्यक्तीक बॉण्ड, साक्षीदार यांच्यावर दबाव आणू नये, पुराव्याशी छेडछाड करू नये यासह अन्य अटी घालण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही के मंडे यांनी हे आदेश दिले. आरोपीच्या वतीने ऍड डी एस पवार यांनी बाजु मांडली तर ऍड आशिष कुलकर्णी यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली. यापुर्वी कोर्टाने आरोपी नगरसेवक मोसीन मिर्झा व लखन विजय गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला होता मात्र पुन्हा अर्ज केल्यानंतर तो मंजुर करण्यात आला. वेळेत दोषारोप पत्र दाखल करणे आता पोलिसांसमोर आव्हान असुन याचं बाबीचा आधार घेऊन इतर आरोपी जामीनसाठी फायदा घेऊ शकतात.
कळंब ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी कारवाई करत 9 जणांना आरोपी केले असुन अटक केली आहे. निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे,लखन गायकवाड, अक्षय रिटे, मोसीन सलीम मिर्झा,सुशांत सुतार व सागर किसन गराडे (जांभुळगाव ता.मावळ जि.पुणे) केज येथील रेवण सोपान नखाते व कळंब शहरातील समता नगर येथील अनिस अमरोद्दीन तांबोळी यास अटक केली आहे.
ड्रग्जचे कळंब सिंडीकेट हे बीड, केज, परभणी, पुणे या भागापर्यंत हे सिंडीकेट पसरले असुन त्याला काही स्थानिक नेत्यांचे ‘पाठबळ’ व ‘राजाश्रय’ मिळाला हे वास्तव आहे. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कळंब ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाला. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करीत आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.












