धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भाजपामधील अंतर्गत कलह व वादाचा आता दुसरा अध्याय सुरु झाला असुन जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्यावर प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड व्यंकटराव गुंड यांनी टीका केल्यानंतर त्याला सरचिटणीस तथा प्रवक्ते ऍड नितीन भोसले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राजकीय स्तिथी पाहून सत्तेचा लाभ घेणाऱ्या ढोंगी निष्ठावंताना सहन केले जाणार नाही असेही भोसले म्हणाले. शिकाऊ पैलवानांनी तालमीच्या वास्तादाला,ओव्हरटेक करायला बघायचं नसतं …! कळत ना.. अशी पोस्ट व्यंकटेश कोरे यांनी केली असुन ‘वस्ताद’ वरून चर्चा सुरु झाली आहे.
जिल्हाध्यक्षांचा कारभार स्वतःच्या मताने चालतोय की बंगल्याच्या आदेशावर ? पक्षाचे हित महत्त्वाचे की’ बंगला’ हित ? याचे उत्तर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्याना मिळालेच पाहिजे अशी पोस्ट प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड व्यंकटराव गुंड यांनी केली होती. त्यावर भाजप कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर टीका करीत अनेक सवाल केले आहेत.
आमदार पाटील यांच्यावर टीका करताना ऍड गुंड यांनी जिल्हाध्यक्ष यांनाही वादात घेतल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पक्ष शिस्त व जिल्हाध्यक्ष विरोधी भूमिकेमुळे गुंड यांच्यावर पक्ष कारवाईचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याने आगामी काळात काय होते हे पाहावे लागेल. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नाराजी विरोधी मोहिमेला यामुळे ‘ब्रेक’ बसला आहे.
जिल्हाध्यक्षांचा कारभार कसा चालतोय असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहावे. 4 पक्ष बदलत राहून आज निष्ठा आणि पक्षहिताचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार कुणालाही मिळत नाही. पक्षाच्या कठीण काळात कोण उभे होते, कोण संघर्ष करत होते आणि कोण संधी पाहून बाजू बदलत होते, हे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. कोणाच्या आदेशावर कोण चालते यापेक्षा, पक्षाच्या विचारांवर कोण ठाम उभे आहे हे महत्त्वाचे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिकवण्यापेक्षा स्वतःची निष्ठा सिद्ध करावी. कारण पक्ष हा कोणाच्या बंगल्याचा नसतो; पक्ष हा विचारांचा आणि हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घामाने उभा राहिलेला असतो अशी पोस्ट ऍड नितीन भोसले यांनी केली आहे.
2016 ते 2020 व 2025 ते आजतागायत भाजपाचे सर्वात यशस्वी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ राहिले आहेत. 28 वर्ष सलग निष्ठेने काम करूनही विधानपरिषद निवडणुकी मधे मिळालेली आमदारकी पक्षाने सांगितले नंतर पक्षहित लक्षात एका क्षणात सोडणारे जिल्हाध्यक्ष…. ही खरी निष्ठा अन हे स्वतःच्या घरात जिल्हा परिषद तिकीट न मिळाल्याने स्वतःच्या पक्षाच्या विरोधात काम करणारे हे आताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत कमळ चिन्हाच्या विरोधात प्रचार करणारे निष्ठा शिकवणार काय ? ज्यांनी वारंवार राजकीय भूमिका बदलल्या, त्यांनी निष्ठेची भाषा करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला ऍड भोसले यांनी दिला आहे.











