55 पैकी 27 विद्यार्थी MBBS रेसमध्ये, 10 विद्यार्थी 600 च्या पुढे – जनहित याचिका करणार, सुधीर पाटील
धाराशिव – समय सारथी
नीट परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे धाराशिव शहरात असु शकतात, नीट परीक्षा झाल्यावर उत्तर की (answer key) येण्यापुर्वी लातुर पॅटर्न सायन्स अकॅडमी या क्लास चालकाच्या बलवीर सर यांनी धाराशिव शहरात बॅनर लावले असल्याचा आरोप संस्थाचालक सुधीर अण्णा पाटील यांनी केला. त्या बॅनरमध्ये 55 पैकी 27 विद्यार्थी MBBS च्या रेस मध्ये,NEET 2026 मध्ये 55 पैकी 10 विद्यार्थी 600 च्या पुढे असा दावा करीत त्यांनी मुलाच्या मार्कसह फोटो लावले, हा गंभीर प्रकार असुन याची तक्रार सीबीआयकडे व पोलिसांकडे करणार आहे. याची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली. संस्थाचालक संघटना याबाबत भुमिका घेणार आहेत. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी कोर्टात जनहीत याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
2 वर्षांपूर्वी मोटेगावकर इथे आले होते, त्यावेळी ते म्हणाले की आपल्याकडे काही आर्थिक क्षमता असलेले विद्यार्थी मिळू शकतात का, त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने पास करू शकतो असे म्हणाले तेव्हा आम्ही नकार दिला. त्यांची 5 लाख, 3 लाख व 60 हजार अशी वेगवेगळी फीस आहे. आर्थिक निकषावर जर हे होत असेल तर सामान्य मुलांनी शिकायचे नाही का ? असा सवाल केला. देशाचे भवितव्य ठरवणारी ही परीक्षा असुन पारदर्शकपणा असला पाहिजेत.
पीसीबी ग्रुपवर आधी निवड व्हायची, 2019 पासुन एनटीए ही सोसायटी ऍक्ट खाली नोंदणी असुन ते प्रिंटिंगसह इतर यंत्रणा आऊट सोर्सिंग करतात.एमबीबीस झालेले विद्यार्थी पुढे युपीएससी करतात. नीट घोटाळा देशभर असुन त्यांचे धागेदोरे दुरवर पसरले आहेत. युपीएससी सारखी रचना असलेले मंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. सरकारने हे केले नाही तर येत्या काळात यासाठी कोर्टात जनहीत याचिका करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
अनेक विद्यार्थी रात्र दिवस अभ्यास करतात मात्र ज्या पद्धतीने पेपर फोडले जातात त्यामुळे हुशार विद्यार्थी यांना संधी मिळत नाही, ज्याची क्षमता नाही ते विद्यार्थी निवडले जातात. पेपर व त्याची उत्तरे 10 -15 दिवस आधी मिळतात त्यामुळे त्यांना चांगले मार्क पडतात. पालकांनी सावध राहिले पाहिजे, बॅनर होर्डिंग लावले जातात त्यांना बळी पडले नाही पाहिजेत. जे विद्यार्थी तिथे क्लासेसस मध्ये शिकत नाहीत त्यांना चांगले मार्क पडले की त्यांचे फोटो लावले जातात.
धाराशिवमध्ये सुद्धा लातुर पॅटर्नचा शिरकाव झाला असुन काही क्लासेस यांनी परीक्षा उत्तर की येण्याच्या आधीच 600 प्लस मार्क मिळणार असा दावा करीत बॅनर लावले. त्यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून. धाराशिव येथे काही लोक असुन त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली, सीबीआयला ती नावे गोपनीयरित्या देऊ असे ते म्हणाले. येत्या काही दिवसात अनेक बाबी बाहेर येतील.











