धाराशिव – समय सारथी
भाजपमधील जुना नवा वाद निवळला असल्याचे दिसताच या वादात जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी उडी घेतली असुन आक्रमक होत त्यांनी भाजपच्या नेत्यांना खडेबोल सुनावीत काही सवाल केले आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळे सत्ता व यश मिळाले असुन त्यांच्यावर हेतुपुरस्पर निंदा आरोप करू नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. निष्ठावान म्हणता तर मागील 30 वर्षांमध्ये भाजपच्या पक्ष संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान दिले आहे.
एकीकडे मल्हार पाटील यांची भावनिक साद घालणारी पोस्ट तर दुसरीकडे अर्चना पाटील यांचे खडेबोल सवाल यातुन पाटील कुटुंबात समन्व्य व विरोधाभास दिसुन आला, यापूर्वी देखील मेघ पाटील यांनी अश्याच प्रकारे पोस्ट केली मात्र नंतर डिलीट केली. एकाने आक्रमक व्हायचे तर दुसऱ्याने मलम लावत भावनिक करायचे अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली. मल्हार पाटलांची “काही नाती शब्दांपेक्षा भावनांनी जुळलेली असतात…” ही भावनिक पोस्ट तर दुसरीकडे अर्चना ताई यांचे गेल्या ३० वर्षांत पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा… असे आव्हान करणारी पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. भाजप नेते काय उत्तर व योगदानाचे संदर्भ देतात हे पाहावे लागेल.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कार्यपद्धती बाबतीत काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नाराजी आहे. माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड अनिल काळे, ऍड व्यंकट गुंड यांच्यासह माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जाहीर टीका केली होती तर बसवराज पाटील यांनी कान टोचले होते. भाजपच्या नेत्यांच्या 30 वर्षाच्या पक्षीय योगदानाची ‘मापे’ अर्चना पाटील यांनी काढली आहेत.
अर्चना पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न मांडले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांना माझी एक विचारणं आहे. मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे पण आज स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांना माझी एक विनंती आहे की मागील 30 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान दिले आहे.
तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्या कार्यकारिणीमध्ये कोणत्याही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती असे दाखवून द्यावे. विनाकारण एखाद्या वरती हेतूपुरस्कर आरोप किंवा निंदा करू नये. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशानंतर स्वतः भारतीय जनता पार्टीकडून तुळजापूर तालुक्यामध्ये आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. त्यानंतरचा कालखंड आपण पाहत आहोत आणि पाहत होतो आणि पाहत आहोत. 11 पंचायत समिती पैकी 8 पंचायत समितीवर महायुती व भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टी व महायुतीने एक हाती सत्ता मिळवत आजपर्यंतच्या काँग्रेसच्या व इतर पक्षांच्या सत्ता समीकरणाला खंडित पाडत सत्ता स्थापन केली असे पाटील यांनी म्हण्टले आहे.









