धाराशिव – समय सारथी
राज्यातील उबटा गटाचे खासदार फुटीची चर्चा चालु असतानाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर हे महायुतीचेच असे म्हणटले त्यावर ओमराजे यांनी हसत प्रतिसाद दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. भविष्यामध्ये तुम्ही बघा, पुढे पुढे काय होतयं. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा काही बदल झाला तर आपणाला वेगळं वावग वाटायला नको असे पालकमंत्री म्हणाले. एकाच दिवसात पालकमंत्री यांनी 2 वेळेस बदलाचे वक्तव्य केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महायुतीकडून पालकमंत्री यांचे स्वागत केले त्या सत्काराला उत्तर देताना प्रतापराव सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवले व ओमराजे महायुतीचाच असल्याचं वक्तव्य केले. सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर ओमराजे यांनी देखील हसून प्रतिसाद दिला मात्र आमदार कैलास पाटील यांनी हा सत्कार जिल्ह्याच्या वतीने असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमके स्टेजवर काय घडत आहे हे पाहून अनेक जन बुचकुळ्यात पडले. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत असून खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात जाणार का याची चर्चा रंगली, खासदार ओम राजे निंबाळकर यावर मात्र बोलण्यास नकार देत आहेत मात्र आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही दोघे एकनिष्ठ असुन सत्तेसाठी जाणार नाही, संघर्ष करणार.