धाराशिव – समय सारथी
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर हे मुंबई येथील मेघदूतवरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर धाराशिव जिल्ह्यात सक्रीय झाले आहेत. ठाकुर यांनी धाराशिव येथे बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन केले यावेळी पदाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा मांडत भावना मोकळ्या केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, सहकार विभागाचे प्रदेश सहसंयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड अनिल काळे, सतीश देशमुख, कैलास शिंदे, ऍड नितीन भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
धाराशिव लोकसभेत महायुतीचा पराभव भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागला असुन आत्मचिंतन बैठकनंतर आता पक्ष संघटन व इतर बाबीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
मी आधी पक्ष संघटनेचा कार्यकर्ता, जो संघटनेत काम करेल तो आगामी काळात टिकेल. पक्षाच्या हीताचे निर्णय घेतले जातील, व्यक्ती हिताचा निर्णय घेतला जाणार नाही. सर्वांची बांधीलकी संघटनेसाठी असेल, प्रदेश पातळीवर सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. पक्षासाठी जो वेळ देईल तो आपला असे सांगत त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले यावेळी काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त होत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठाकुर सक्रीय झाल्याबद्दल आभार मानत त्यांच्या मनातील व्यथा मांडल्या त्यात मुख्यत्वे महायुतीतील मानपान व कुरघोडी, होणारी कुचंबना, विकास निधी व इतर बाबींचा समावेश होता. काही जणांनी स्वबळाचा नारा देत भाजपच्या चिन्हावर उमेदवार व आमदार हवा असा आग्रह धरला. सत्ता असूनही कामे होईना, सहयोगी पक्षांकडुन होणारी परवड अश्या व्यथा मांडल्या.
ठाकुर यांनी मुंबई येथे मेघदूतवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, दत्ता कुलकर्णी , प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड अनिल काळे, ऍड व्यंकटराव गुंड , जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे यांच्यासह भेट घेतली यावेळी संघटनात्मक, आगामी निवडणूका तसेच विविध विकास कामे अशा अनेक विषयावर विस्तृत चर्चा केली. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात जात ठाकुर यांनी गाठीभेटी घेतल्या.