येत्या अधिवेशनात ‘राईट टू हेल्थ’ विधेयक मांडण्याचा मानस – आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत
पंढरपूर – समय सारथी
आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित आयोजित महाआरोग्य शिबिरात ११ लाख ५० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या ठिकाणी तपासणीअंती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील योग्य ते उपचार राज्य शासनाच्या दवाखान्यात मोफत करण्यात येत आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली.
महाआरोग्य शिबिरात अतिदक्षता विभाग, आपला दवाखाना तीनची निर्मिती, परिसरात १२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६० सुसज्ज रुगणवाहिका, २ हजार ९०० कर्मचारी, रुग्णाचे नियोजन करण्यासाठी वार रुम कार्यान्वित आहे. वारकऱ्यांना महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. २४ नोव्हेंबर पर्यंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अधिकाधिक वारकऱ्यांनी या शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ सावंत यांनी केले.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मोफत उपचार संकल्पनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्यांनी बाह्य व अंतर्रुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे.
देशाचे प्रधानमंत्री यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याकरिता राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ असले पाहिजे. त्यादृष्टीने येत्या अधिवेशनात ‘राईट टू हेल्थ’ विधेयक मांडण्याच्या मानस केला आहे. येत्या काळात राज्याचे आरोग्य खाते देशात क्रमांक एकवर नेऊ, असा संकल्प डॉ. सावंत यांनी केला. हा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक होईल.
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत राज्यातील दोन ते अडीच लाख गृहभेटी देऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांना आजार होऊच नये याकरीता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी,मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भैरवनाथ समूहाचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव सावंत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, वारकरी उपस्थितीत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सावंत परिवाराचे कौतुक
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक येत असतात. त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत आणि त्यांचे बंधू प्रा शिवाजीराव सावंत यांनी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सदरचे महाशिबीर पार पडल्यानंतर एक ‘महारेकॉर्ड’ तयार झाला. त्यामध्ये सुमारे ११ लाख रुग्णांनी विविध तपासण्या करत उपचार प्राप्त करुन घेतले. ज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होते, त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. गरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.तुळजापूर येथेही नवरात्र उत्सवात महाआरोग्य शिबीर घेतले त्यातही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलगणा येथील भाविकांनी लाभ घेतला.