मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मोठी मागणी
मुंबई :
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलाय. या राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी प्रचारप्रमुख म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मागणी येत असल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत फडणवीस यांच्या 3 राज्यांमध्ये 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत. त्यामुळे देशातल्या भाजपच्या आश्वासक नेत्यांपैकी एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. मध्यप्रदेशात भाजप, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस तर तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे. सध्या केंद्रातल्या सत्ताधारी भाजपने मध्यप्रदेशसह इतर तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चंग बांधलाय. या सगळ्याच राज्यांमधल्या प्रचारात भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचाराची भिस्त ही दुसऱ्या – तिसऱ्या कुणावर नसून महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणीस यांच्यावर आहे. कारण, बिहार आणि गोवा या राज्यांमध्ये प्रचारप्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठी किमया केली होती. गोव्यात भाजपचं सरकार प्रथमच स्थापन करण्याचं श्रेय हे फडणवीस यांनाच गेलं होतं.
गोव्यातील भाजपच्या यशाचं महाराष्ट्र कनेक्शन आहे ते देवेंद्र फडणवीसांमुळे असं तेव्हा बोललं गेलं. अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणला होता. तर, बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यापेक्षा अधिक आमदार हे भाजपचे निवडून आले होते. त्यावेळी बिहारमध्ये कमाल केल्याबद्दल केंद्रातल्या भाजप नेत्यांनी फडणवीस यांची पाठ थोपटली होती. फडणवीसांच्या या करिष्म्यामुळे पक्षात त्यांचं वजन वाढलंही होतं.
राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचा लाभ
फडणवीस यांच्या या पूर्वानुभवाचा फायदा भाजप यंदा मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये करून घेतंय. देशातल्या आश्वासक नेत्यांपैकी एक अशा फडणवीस यांच्या झालेल्या प्रतिमेचा भाजपला या निवडणुकांमध्ये लाभ मिळवायचा आहे. यापूर्वीही फडणीस यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलल्याने निवडणूक प्रचारात सध्या त्यांचीच चलती दिसून येतेय. निवडणूक प्रचार सभा आणि दौरे करताना फडणवीस यांना स्थानिकांनाकडूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या सभांना रेकॉर्डब्रेक गर्दीही झाली होती.
कुठे किती सभा?
मध्यप्रदेश
18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर असे 3 दिवस 3 दौरे
धार, इंदोर, महू, बुरऱ्हाणपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी एकूण 8 सभा आणि रोड शो देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.
छत्तीसगड
30 ऑक्टोबरला 1 दिवस 1 दौरा
धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो फडणवीसांनी केले.
राजस्थान
14 सप्टेंबर 1 दिवस 1 दौरा
केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर येथे एकूण 5 सभा फडणवीसांनी घेतल्या.