‘लबाडाचे आवतन’ म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःचा हिशेब द्यावा
धाराशिव – समय सारथी
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले, हे सत्य आहे. मात्र संकटाच्या काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मदतीचे निकष शिथिल केले आणि तीन हेक्टरपर्यंत मदतीची मर्यादा वाढवली. धाराशिव जिल्ह्यासाठी गेल्या वर्षीच्या नुकसानीपोटी एकूण ₹१,०५८ कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने काहीच केले नाही, असा ठाकरे गटाचा आरोप दिशाभूल करणारा आहे, असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला.
ऑगस्ट महिन्यात ₹१८९ कोटी, सप्टेंबरच्या नुकसानीसाठी ₹२९२ कोटी आणि आता आणखी ₹५७७ कोटी अशी एकूण ₹१,०५८ कोटींची मदत मंजूर झाली आहे. या मदतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
“आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार आहे; मात्र शेतकऱ्यांच्या दुःखाचे राजकारण करू नका. शासन आदेशाची होळी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करा,” असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे गटाने आंदोलन करण्यापूर्वी २०२१ मध्ये त्यांच्या सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत दिली, किती क्षेत्राला मदत मिळाली आणि त्यावेळी मदतीचे निकष काय होते, याचा हिशेब जनतेसमोर द्यावा, असेही कुलकर्णी यांनी म्हटले.
यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून सरकारने दुष्काळ जाहीर करून मदतीची प्रक्रिया सुरू केली आहे. “गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि यंदा दुष्काळ, संकट शेतकऱ्याचे आहे. त्यामुळे राजकीय स्टंटबाजीपेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्याला प्राधान्य द्यावे. आकडेवारी घेऊन या; आम्हीही हिशेब घेऊन मैदानात उतरतो,” असे खुले आव्हान दत्ता कुलकर्णी यांनी दिले.











