धाराशिव – समय सारथी
कलाकेंद्रातील अंतर्गत वादातुन मारहाण करून एका गर्भवती नर्तिकेचा खुन केल्याची घटना घडली असुन तिचा मृतदेह 275 किलो मीटर दुर जंगलात नेहून पेट्रोल टाकून जाळण्यात आला. या प्रकरणी कळंब येथील 4 व इतर 2 अश्या 6 जणांना अटक केली असुन धुळे पोलिस व धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अतिशय अमानवीय अश्या या गुन्ह्याची 3 दिवसात उकल करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही नर्तिका यापुर्वी धाराशिव येथील एका कला केंद्रावर होती, अशी माहिती आहे. मयत व आरोपी हे कळंबचे असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.
मयत नर्तिका 31 वर्षीय पिंकी हनुमंत काटकर ही रायगड जिल्ह्यातील असुन ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसुर या कला केंद्रावर होती. अटक केलेल्या आरोपीत 3 महिला व 3 पुरुष आहेत. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार,सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, पोह फरहान पठाण,चापोह नागनाथ गुरव यांनी ही कारवाई केली, यात स्थानिक गुन्हे शाखेची भुमिका महत्वाची ठरली. दुसऱ्या टीमने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सपोनि समाधान बजबळकर, पोहेकों महादेव मुंडे, पोहेका अजीज शेख, मपोअ सपना गिते यांचे पथकाने 2 आरोपीना मुद्देमालसह अटक केली.
धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ परिसरातील गरताडबारी घाटाजवळ निर्जन ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सहा संशयित आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी नरव्हाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गाच्या पश्चिमेला मुरमाड टेकड्यांलगत वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी अनोळखी महिला गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळली. वैद्यकीय अहवालानुसार ती गर्भवती असल्याचा व जळल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आला. या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 322/26, भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडीनगर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यात आले.
तब्ब्ल 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी महामार्गावरील सुमारे 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयित वाहनाची माहिती मिळाली. वाहनाचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांचे पथक जामखेड, जि. अहिल्यानगर येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रापर्यंत पोहोचले. तेथून पोलिसांनी कळंब येथील सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (38) आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (31) व लक्ष्मी बालाजी पवार (30) व फारुख शेख या 4 जणांना तर जामखेड येथील नर्तिका स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28) व छत्रपती संभाजीनगर येथील रोहिणी जाधव अश्याच 6 जणांना अटक केली आहे.
कलाकेंद्रातील वादातून मारहाण
महिलेचा कलाकेंद्रातील अंतर्गत वादातून आरोपींसोबत वाद झाला. त्यानंतर तिला बीड येथील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात मारहाण करण्यात आली. त्यात ती बेशुद्ध झाली. ती मृत झाल्याचे आरोपींना वाटल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला वाहनातून राजस्थानच्या दिशेने घेऊन जाण्याचे ठरवले. मात्र, सुमारे 275 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्जन वनक्षेत्रात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. त्यानंतर आरोपी मालेगाव-मनमाड मार्गे जामखेडच्या दिशेने निघून गेले.
अटक केलेल्या आरोपींपैकी सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव व बीड जिल्ह्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, नितीन करंडे, अशोक पायमोडे तसेच पोलीस अंमलदारांनी केली.












