राणाजगजीतसिंह पाटीलांच्या लाडासाठी पाणी देणार नाही – शिवसेना शिंदे गट
धाराशिव – समय सारथी
सोलापूर येथुन तुळजापूर व धाराशिवला पाणी देण्यासाठी मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असुन रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील पण आम्ही घाटणे बॅरेजमधील पाणी धाराशिवला देणार नाही अशी भुमिका बैठकीत घेण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष पाटील यांनी आक्रमक होत भूमिका मांडली, शेतकऱ्यांच्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते.
सोलापुरातून तुळजापूर धाराशिवला पाणी देण्याला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. घाटणे बांधाऱ्यातून तुळजापूरला पाणी देऊ नये असा एकमुखी निर्णय शेतकऱ्यांच्या बैठक घेण्यात आला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे लाड पुरवण्यासाठी सीना नदीतील आमच्या हक्काचे पाणी तुळजापूरला दिले जात आहे मात्र आमचे गळे चिरले तरी आम्ही घाटणे बॅरेजमधून पाणी नेऊ देणार नाही अशी भुमिका मांडली.
सीना नदीवर असलेल्या घाटणे बॅरेज बांधाऱ्यातून तुळजापूर तालुक्यात पाणी नेण्याबाबत ट्रायल घेण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना मोबदला द्या, आमच्या हक्काच्या पाण्याची तरतूद करा अशी मागणी आहे. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही मात्र ते कृष्णा नदीतून उजनीत आणा आणि मग द्या आमचा विरोध नाही मात्र आमच्या हक्काचे पाणी दिल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला.
आगामी काळात दुष्काळात पाणी प्रश्न चांगलाच पेटणार आहे. आमदार पाटील यांच्या समर्थनार्थ तुळजापूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी व भाजप रस्त्यावर उतरणार असुन हक्काच्या पाण्यासाठीचा लढा आणखी तीव्र होणार असल्याचे दिसते.











