शासकीय कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे 4 गावातील हजारो शेतकरी राहणार दुष्काळी लाभापासुन वंचित
राघूचीवाडी, केकतवाडी, जाधववाडी व म्होतरवाडी यासह 4 गावातील स्थिती
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील राघूचीवाडी, केकतवाडी, जाधववाडी व म्होतरवाडी यासह 4 गावातील शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना काय असतो याचा प्रत्यय येत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे 4 गावातील शिवारात ई पीक पाहणी होत नाही, ई पीक पाहणी होत नसल्याने ऐन दुष्काळात शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाय योजनेपासुन वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे.
ना पीक विमा, ना दुष्काळी अनुदान, कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. ही गावे धाराशिव शहराजवळ असल्याने हद्द वाढीच्या कायदेशीर वादात कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकामुळे शेतकरी वंचित राहत आहेत, शासनाकाडे निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. मायबाप सरकारने या दुष्काळात तरी आमचा प्रश्न सोडवून जगण्याचा आधार द्यावा अशी मागणी केली आहे.












