धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नुतन इमारती पाठोपाठ विविध वैद्यकीय सुविधाट भर पडत आहे. विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असून, स्थानिक पातळीवरच व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
नवीन शासकीय नर्सिंग कॉलेजमुळे धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासोबतच आरोग्य व्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने भविष्यात जिल्ह्यातील आरोग्यसेवेलाही त्याचा फायदा होऊ शकतो.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारचे आभार मानले. धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक व आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी यापुढेही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.












