वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक – आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांची संकल्पना
धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला आता गती मिळाली आहे. तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रातील सुमारे 450 एकर क्षेत्रावर देशी, औषधी आणि आयुर्वेदिक वृक्षांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी नैसर्गिक प्रतिमा साकारण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या माध्यमातून प्रस्ताव शासनस्तरावर पुढे नेण्यासाठी सकारात्मक पाऊल पडल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रातील गट क्रमांक 344 आणि 418 मधील जागेचा यासाठी विचार करण्यात आला आहे. विविध प्रजातींची नियोजनबद्ध लागवड करून जमिनीवरून तसेच आकाशातूनही स्पष्टपणे दिसेल, अशा भव्य आकारात शिवरायांची प्रतिमा साकारण्याची कल्पना आहे. या निसर्गशिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ते दगड, धातू किंवा काँक्रीटचे पारंपरिक स्मारक नसेल, तर वृक्ष, झुडपे आणि वनस्पतींनी साकारलेले ‘जिवंत’ शिल्प असेल. ऋतुमानानुसार वनस्पतींच्या रंगछटा बदलत असल्याने त्याचे रूपही वर्षभर बदलत राहणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाहिल्यास या भव्य प्रतिमेचे विहंगम दृश्य अधिक प्रभावी ठरणार आहे. या उपक्रमामागे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिनव पद्धतीने अभिवादन करून देशी वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, पर्यटनविकास आणि रोजगारनिर्मिती अशी व्यापक उद्दिष्टे असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
प्रस्तावित आराखड्यात आयुर्वेदिक व औषधी वनस्पती उद्यानासह योगशाळा, निसर्गोपचार केंद्र, थेरपी स्टेशन, आयुर्वेद मार्गदर्शन केंद्र आणि व्यायामशाळा उभारण्याचाही विचार आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना या माध्यमातून धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग, इतिहास, आरोग्य आणि अध्यात्माचा अनोखा अनुभव घेता येईल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन निवास, वाहतूक, खाद्यपदार्थ आणि अन्य पर्यटनपूरक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. वनमंत्री गणेश नाईक साहेबांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रकल्पाची व्यवहार्यता, वनविभागाशी संबंधित प्रक्रिया, जागेचा नियोजनबद्ध वापर आणि शासनाचा सहभाग याबाबत पुढील कार्यवाहीला मोठी दिशा मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची श्रद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, आणि निसर्ग संवर्धन तीन शक्तींचा संगम घडविणारे हे निसर्गशिल्प तुळजापूरच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल. देश-विदेशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी हे निसर्गशिल्प श्रद्धा, प्रेरणा आणि पर्यावरण संवर्धनाचे चिरंतन केंद्र ठरू शकते. हे निसर्गशिल्प भविष्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची आणि पर्यावरणपूरक विकासदृष्टीची जागतिक ओळख म्हणून नावारुपाला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
रामलिंग अभयारण्य विकासासाठी पुढाकार
धाराशिव तालुक्यातील येडशी-रामलिंग वन्यजीव अभयारण्याचा नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकास करून निसर्ग पर्यटनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभयारण्याची समृद्ध जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांसमोर प्रभावीपणे आणण्यासाठी मूलभूत सुविधा, निसर्गभ्रमंतीच्या वाटा तसेच पर्यटनपूरक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रस्तावित जंगल सफारीमुळे पर्यटकांना येथील वन्यजीव व निसर्गसंपदेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. स्थानिक युवक व नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
या विकासप्रक्रियेत पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत पर्यटन विकासासाठी आवश्यक निधी, प्रशासकीय बाबींना गती दिली जाईल अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.











