धाराशिव – समय सारथी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व युवा भारतच्या वतीने धाराशिव शहरात युवा संमेलन 2026 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा विचार, नवीन दिशा आणि सक्षम भारत या संकल्पनेवर आधारित या संमेलनात युवकांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी विचार देण्यात येणार आहेत. मंगळवार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत शहरातील परिमल मंगल कार्यालयात येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर घडविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असून, मार्गदर्शक म्हणून गोरक्षनाथ आबुज उपस्थित राहणार आहेत. युवकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, उपलब्ध संधींचा योग्य वापर कसा करावा आणि करिअरची दिशा कशी निश्चित करावी, याबाबत या सत्रात मार्गदर्शन होणार आहे.
यानंतर दुपारी 2 ते 3 या वेळेत राष्ट्रनिर्माण संकल्प या विषयावर विशेष सत्र होणार आहे. तसेच पोलीस तक्रार प्राधिकरण, मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगरचे सदस्य मिलिंद बिलोलीकर युवकांशी संवाद साधणार आहेत. युवकांना करिअरच्या संधींसोबतच सामाजिक जबाबदारी, राष्ट्रनिर्माणातील योगदान आणि सक्षम भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका याबाबत दिशा देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












