कमर्शीयल क्षमता – पोलिसांच्या तपासात प्रगती, आरोपींची संख्या 6, पोलिस अधीक्षक रितु खोखर
धाराशिव – समय सारथी
परभणी पाठोपाठ कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याचा सहभाग असल्याने धाराशिव पोलिसांनी त्याला आरोपी केले असुन परभणी कोर्टाकडुन ट्रान्झिट रिमांडला मंजुरी देण्यात आली आहे. मिर्झा हा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडी असुन आता धाराशिव पोलिस कारागृहातुन तपासासाठी ताबा घेणार आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी याबाबत माहिती दिली असुन ड्रग्ज गुन्ह्यात एकाही आरोपीला सोडले जाणार नाही अशी त्यांची ठोस भुमिका आहे.
मिर्झा याला आरोपी केल्याने ड्रग्ज तस्करीचे कळंब नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. परभणी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात छत्रपती संभाजीनगर मार्गे मध्यप्रदेश कनेक्शन समोर आले असुन बीड, लातुरसह अन्य जिल्ह्यातील आरोपी आहेत. आंतर जिल्हा व राज्य कनेक्शन असुन सखोल तपास सुरु आहे. तुळजापूर नंतर कळंब ड्रग्ज सापडले आहे. कळंब येथे सुरुवातीला 2 आरोपीना अटक केली होती, तपासात आरोपीची संख्या 6 वर गेली आहे त्यातील 3 आरोपी जेलमध्ये 1 पोलिस कोठडीत तर 2 जणांचे अटक वॉरंट मिळाले आहे.
ड्रग्ज हे विष असुन तरुण पिढी बरबाद करते, राजकीय नेत्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचुन काढा. राजकारणापेक्षा समाजहीत पहा. कोणत्याही पक्षाचा किंवा कोणाचाही वरदहस्त असला तरी त्याला तात्काळ तुरुंगात टाकून कठोरात कठोर कारवाई करा, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री हे पोलिसांच्या सोबत आहेत असे पालकमंत्री म्हणाले होते. त्यानंतर ड्रग्ज तपासाला गती आली आहे.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. 11 ग्राम ड्रग्ज हे कमर्शीयल (व्यवसायीक) क्षमतेचे असल्याने सर्व आरोपी समोरील अडचणी वाढल्या आहेत. व्यवसायीक क्षमता असल्याने जामिनसह कायदेशीर अडचणी वाढणार आहेत.
निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे व लखन गायकवाड हे 3 आरोपी जेलमध्ये आहेत. अक्षय रिटे या आरोपीला 20 ऑगस्ट पर्यंत वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत. पोलिस हे तस्करी करणाऱ्याना आरोपी करीत असुन विक्री, पुरवठा, सेवन करणारेही रडारवर आहेत.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या असुन आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था.गु.शा. धाराशिव , सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली आहे.










