धाराशिव / कळंब – समय सारथी
कळंब ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु असताना परभणी पोलिसांनी कारवाई करीत कळंब येथील नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याच्यासह 6 ड्रग्ज तस्करांना अटक करीत आंतर जिल्हा रॅकेट उघड केले आहे. कळंब येथे सुद्धा पोलिसांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक केली असुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असुन आणखी एका आरोपीला अटक केली आहे. कळंब येथील ड्रग्ज तस्करीचा म्होरख्या हाच की इतर आहे याचा शोध सुरु आहे. मिर्झा हा उबाठा ठाकरे गटाचा नगरसेवक असुन पक्ष काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरात मोठी कारवाई करीत निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे या 2 आरोपीना अटक केली होती, त्यांच्याकडुन 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यात पोलिसांना स्थानिक साखळी शोधण्यात तितकेसे यश आले नाही, आणखी एका आरोपीला अटक केले आहे.
परभणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली. मोसीन सलीम मिर्झा (रा. कळंब, जि. धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (रा. बीड), बाबा मोमीन रफीक (रा. लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), शेख सलमान शेख इरफान (रा. काकर मोहल्ला, परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (रा. बरकत नगर, परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे. कोर्टाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.











