भाजपची ताकद घराणेशाही नाही तर कार्यकर्त्यांचा त्याग – ऍड व्यंकटराव गुंड यांची फेसबुक पोस्ट
धाराशिव – समय सारथी
भारतीय जनता पक्ष हा कोणाच्याही सरंजामी प्रभावावर उभा राहिलेला पक्ष नाही. हा लाखो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्याग, संघर्ष, समर्पण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी असलेल्या अखंड निष्ठेवर उभा राहिलेला वटवृक्ष आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड व्यंकट गुंड यांनी फेसबुकवर पोस्ट करीत दिली आहे.
आम्ही सत्ता नसताना भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन गावोगावी पक्ष वाढवला. आज काही जण स्वतःचा पक्ष अडचणीत आल्यानंतर भाजपमध्ये आले आणि ३०–४० वर्षे संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांनाच प्रश्न विचारत आहेत. हा इतिहास जनतेला विसरलेला नाही. जनतेने अनेक बलाढ्य नेत्यांना वेळोवेळी पराभवाची चव चाखवली आहे. त्यामुळे संघर्षाचा इतिहास विसरून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही प्रामाणिक आढावा घ्यावा असे ते म्हणाले.
आम्ही गेल्या तीन दशकांत संस्था उभ्या केल्या, हजारो हातांना रोजगार दिला, सहकार आणि समाजकारणाच्या माध्यमातून विकासाची वाट निर्माण केली. त्यामुळे प्रश्न विचारायचे असतील तर जिल्ह्यातील सहकार, संस्था आणि विकास कामांचा हिशेबही जनतेसमोर मांडावा. भाजपच्या व्यासपीठावर कोणाचे फोटो झळकतात, कोणाला प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे केले जाते आणि त्यामागील अधिकृत भूमिका काय आहे, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरेही अपेक्षित आहेत.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपचा पाया सत्ता नाही, तर निष्ठा आहे. भाजपची ताकद घराणेशाही नाही, तर कार्यकर्त्यांचा त्याग आहे. विचारांशी प्रामाणिक राहू… कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी ठाम उभे राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.











