पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित सर्वोच्च प्राथमिकता – मीडिया टीमचे ‘कांड’, घरभेदी
धाराशिव – समय सारथी
भाजपाही लाखो कार्यकर्ते यांचा त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार असुन पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील असे म्हणत जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी फेसबुकवर खुलासा केला आहे.
निष्ठावान म्हणता तर मागील 30 वर्षांमध्ये भाजपच्या पक्ष संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी दिले होते त्यानंतर भाजपात जुने नवे पदाधिकारी यात आरोप प्रत्यारोपाचे मोठे वादंग निर्माण झाले होते.
सदरील पोस्ट ही त्यांच्या सोशल मीडिया टीमने पुर्वपरवानगी न घेता पोस्ट केल्याचा खुलासा त्यांनी फेसबुकवर केला असुन भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली करीत या वादावर पडदा टाकला आहे. हे सर्व ‘कांड’ मीडिया टीमने केले असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्चना ताई यांच्या मोबाईल व्हाट्स ऍपवर हे स्टेट्स ठेवले होते, मीडिया टीमने हे ‘कांड’ केले असेल तर घरचा ‘भेदी’ कोण ? त्याने हे का व कोणाच्या सांगण्यावरून केले ? ताईंची प्रतिमा मलीन करण्याच्या कटात सहभागी विद्रोही घटक पुढे येणे गरजेचे आहे. जबाबदार नेत्यांनी स्वतः सोशल मीडिया हाताळणे गरजेचे असल्याचे या निमित्ताने समोर आले.
मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.
भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील असे त्या म्हणाल्या.










