धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी विशेष लेखापरीक्षणाला सुरुवात झाली असुन जवळपास 200 संचिका गहाळ असल्याची सुत्रांची माहिती आहे. उपलब्ध असलेल्या संचिकाची लेखा परीक्षण विभागाने तपासणी केली असुन काही संचिका उपलब्ध नसल्याचे नगर परिषदेने पथकाला लेखी दिल्याची माहिती आहे. लेखा परीक्षण समिती काय अहवाल देते याकडे लक्ष लागले आहे.
संचिका गहाळ प्रकरणात गुन्हे नोंद करावेत अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. धस यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना लेखी पत्र दिले असुन तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे, फड व लेखापाल सुरज बोर्डे याचेवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
बांधकाम विभागातील मोजमाप पुस्तिका, गुणवत्ता अहवाल यासह अन्य कागदपत्रे ही काही ठेकेदार यांच्याकडे असल्याची माहिती आहे. गहाळ संचिका बाबत नेमका अहवाल काय जातो हे पाहावे लागेल, त्या अहवालानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. गैरव्यवहार, अनियमितता किती, त्याचे स्वरूप व त्याला जबाबदार कोण हेही स्पष्ट होणार आहे.
आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण होत आहे. 27 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला असुन ते पाठपुरावा करीत आहेत.
नगर परिषदेतील विविध घोटाळ्यात यलगट्टे यांना 7 महिने जेलवारी करावी लागली होती तर सुरज बोर्डे यांना 1 महिना जेलमध्ये राहावे लागले होते. धाराशिव येथील घोटाळ्यात यलगट्टे यांना पुर्वलक्षी प्रभावाने निलंबित करण्यात आले असुन ते आजतागायत निलंबित आहेत तर सुरज बोर्डे यांना निलंबनानंतर सेवेत सामावून घेतले आहे. संचिका गहाळ, विशेष लेखा परीक्षण व त्या अनुषंगाने आमदार सुरेश धस यांनी जामीन रद्द व्हावा यासाठी पत्र दिले आहे.












