धाराशिव – समय सारथी
भुम नगर परिषदेचे 8 नगरसेवक धमकी देत असुन त्यांच्यापासुन जीविताला धोका असल्याची तक्रार मुख्याधिकारी शैला डाके यांनी केली असुन पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली. या तक्रारीनंतर पोलिस संरक्षण देणेसंदर्भात योग्य ते आदेश निर्गमीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांना दिले आहेत.
नगर परिषद सदस्य यांचे धमकी देणे, दबाव निर्माण करणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी मुख्याधिकारी यांनी केली होती.
नगर परिषद सदस्य रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, आबासाहेब मस्कर, रामराजे कुंभार, नवनाथ रोकडे, विठ्ठल बागडे व पवार हे 8 नगरसेवक नगरपरिषद कार्यालयात पूर्णवेळ हजर असतात. नगरपरिषद कर्मचारी यांना नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव आणतात. कार्यालयात सतत धमकी, अर्वाच्य शिवीगाळ, आरडा ओरडा करतात. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कसे काय कामकाज करता ? ते बघून घेऊ, अशा पद्धतीने कार्यालयात दररोज आरडा ओरडा करतात, असे आरोप मुख्याधिकारी यांनी पत्रात केले आहेत.
सर्व त्रासामुळे कार्यालयात उपस्थित राहुन कामकाज करणे अवघड व भीतीदायक झाले आहे. मुख्याधिकारी यांचे जीवितास ही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासकीय कामकाज करणे अडचणीचे झाले आहे. संबंधितास कार्यालयीन परिसरात पोलीस संरक्षण (कार्यालयीन वेळेत) द्यावे अशी विनंती मुख्याधिकारी नगरपरिषद, भूम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असुन पोलीस संरक्षण देणेसंदर्भात योग्य ते आदेश निर्गमीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत.
दरम्यान याबाबत मुख्याधिकारी शैला डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र याच्यावर बोलण्यास तयार नाहीत मात्र ज्या नगरसेवकांवर हे आरोप केले आहेत त्या नगरसेवकांनी शैला डाके यांच्या काही भ्रष्टाचाराच्या तक्रारी आम्ही केल्या आहेत त्या तक्रारीचा राग धरूनच त्यांनी अशा प्रकारचा कट सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावरून रचला असल्याचा आरोप केला, आगामी काळात यावरून आरोप प्रत्यारोप होऊन वाद पेटणार आहे.











