पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीतून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल – परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील 841 एकर जमिनीवर एसटी महामंडळ राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार असुन पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीतून आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली. आगामी काळात इतर ठिकाणी व जिल्ह्यात असे प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.
एसटी बस आगारातील विविध कार्यालये आणि ई-बस चार्जिंग करण्यासाठी विजेची मोठी गरज लागते. त्यामुळे विद्युत बिलासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असून महामंडळाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. त्यासाठी एसटी महामंडळाचे स्वतःचे सोलार ऊर्जा प्रकल्प उभारले जावे अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना आता सत्यात उतरत असून एसटी महामंडळाचा सोलार ऊर्जा निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प तुळजापूर येथे उभारला जाणार आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली.
हा प्रकल्प तुळजापूरतील चिवरी, होर्टी आणि मुर्टा या तिन्ही गावच्या 841 एकर शासकीय पडीक जमिनीवर साकारला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सदर जागेची पाहणी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली असून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी ही जागा योग्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे असे ते म्हणाले.
हा उपक्रम पर्यावरणपूरक ऊर्जा वापरातून एसटी महामंडळाच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होतील असा आम्हाला विश्वास आहे. आगामी काळात इतर ठिकाणी व जिल्ह्यात असे प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.











