धाराशिव – समय सारथी
भूम, परंडा व वाशी या 3 तालुक्यात बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील जयगुरु गणेश मंडळ व कार्यकारी अभियंता यांनी अपहार केल्याचे निवेदनात म्हण्टले आहे. गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवारची कामे झालेली नाहीत. सर्व गावात महसुल अधिकारी याच्या उपस्थितीतीत ग्रामसभा घ्यावी व चावडी वाचन करावे अशी मागणी केली आहे.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत 5 कोटी 31 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तक्रार करूनही कोणतीही चौकशी व कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा इशारा सुंदर लोमटे यांनी दिला आहे. मृद व जलसधारण विभागात 17 तलावांत काम न करता हे पैसे हडप केल्याचा आरोप केला आहे.
ज्या गावातील पाझर तलावातील गाळ काढला आहे, त्या गावाची ग्रामपंचायत अस्तित्वात असताना दुसऱ्या ग्रामपंचायतीचे काम पूर्णत्वाचे ठराव जोडले आहेत. खासरखोरी ता परंडा हे गाव अस्तिवात नसताना या नावे 24 लाख 59 हजार उचलण्यात आले आहेत. धाराशिव जिल्हयातील गाळ बीड जिल्हयात टाकल्याचे दाखवले आहे असे तक्रारीत नमुद आहे.
तलाव हे जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचे असताना त्याची पाणी साठवण क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचे दाखवून वाढीव व बोगस अंदाजपत्रक दाखवले. जिल्हा परिषदेने तीन ते पाच लाखांचे अंदाजपत्रके तयार केली तर त्याचं कामाचे जलसंधारण विभागकडून तीस ते चाळीस लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
जलसंधारण विभागाच्या गेल्या 5 वर्षातील विविध योजनाच्या कामाचे स्पेशल ऑडिट व सामाजिक लेखापरीक्षण करावे, त्रिसदस्य समिती गठीत करून त्रयस्थ यंत्रनणेकडुन कामाची गुणवत्ता तपासावी. अपहार झाल्याचे उघड झाल्यास रक्कम वसुली व फौजदारी गुन्हे नोंद होणे गरजेचे आहे. गाळ मुक्तसह नाला खोलीकरण व रुंदीकरण योजना वादाच्या भोवऱ्यात आहेत.भुजल सर्वेक्षण विभागाची परवानगी, दक्षता व गुणनियंत्रण पथकाची भुमिका यात महत्वाची आहे. मुख्य अभियंता तथा सह सचिव वि म देवराज यांनी दिलेल्या अनेक निकषाचे उल्लंघन झाले आहे.
काही अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावाने उपकरणे खरेदी करून कामे केली. अशासकीय संस्था निवड प्रक्रिया, गाळवाटपाचे बनावट दाखले व पंचनामे तयार केले. जिओ टॅगिंग, छायाचित्रे, अवनी ऍपवर चुकीची माहिती भरली, बनावट लाभार्थी यादी बनवल्याचा आरोप आहे. भुम तालुक्यातील अंजनसोडा येथे डुक्करवाडी, इराचीवाडी, सोननेवाडी परंडा तालुक्यातील खासापुरी, उंडेगाव, वाशी तालुक्यातील दहिफळ, हातोला यासह अन्य ठिकाणी घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
भाग्यलक्ष्मी, ज्ञानकिरण, कामधेनू, श्री साई, माऊली, पुण्यश्लोक, चंद्राई, चैतन्य,राष्ट्रतेज, जनविकास, शिवराय, यशवंत, शरद, स्वराज्य, स्वयं, अस्मिता, शांतीसागर, युवा पर्व यासह अन्य 20 संस्थानी धाराशिव जिल्ह्यात काम केले आहे. सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर येथील या संस्था आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्थानी केलेली कामे शासकीय योजनेत दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. 2025-26 मध्ये धाराशिव जिल्ह्यात 562 कामासाठी कोट्यावधी रुपये आले होते.











