धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हयातील खरीप व रब्बी हंगाम 2025-26 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (NFSNM) अंतर्गत राबविण्यात आलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) कार्यक्रमात झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचारी असलेल्या सुरवसे यांची सेवा समाप्ती करण्यात आली असुन त्यांना दोषी धरले आहे. आर्थिक अनियमितता व घोटाळा या एकट्याने केला असल्याचा शोध कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लावत खापर एकट्यावर फोडले आहे.
कृषी निविष्ठा घोटाळ्यात 2 जिल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी, 4 मंडळ कृषी अधिकारी अश्या 17 जणांना जबाबदार धरण्यात आले असुन केवळ सुरवसे यांच्यावर कारवाई केली आहे. कंत्राटी कर्मचारी असलेल्या सुरवसे यांच्यावर सेवा समाप्ती अर्थात सेवेतून कायम बडतर्फ करून इतरांना अभय देण्याचा प्रशासकीय घाट आहे. सुरवसे प्रमाणे इतर अधिकारी यांचे निलंबन करून गुन्हे नोंद होणे गरजेचे आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या तक्रारी व पाठपुराव्यानंतर या महाघोटाळ्याला वाचा फुटली. भुमीहीन, मयत, दुबार, बिगर सभासद यांना लाभ दिल्याचे चौकशीत उघड झाले. यात गुन्हा नोंद करून रक्कम वसुलीसह प्रशासकीय कारवाई अपेक्षित आहे.
अंमलबजावणीमध्ये अत्यंत गंभीर स्वरुपाचा वित्तीय अपहार आणि प्रशासकीय गैरवर्तणुक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने संचालक कृषी (विस्तार वं प्रशिक्षण) यांचा अभिप्राय घेण्यात आला त्यानंतर सुरवसे हे या प्रकरणी जबाबदार असल्याने त्यांच्या सेवा समाप्त करणेबाबत निर्णय घेण्यात आला. अनुपालन अहवाल सादर करावा असे आदेश विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांनी दिले आहेत.
प्रभारी कृषी उपसंचालक पुरुषोत्तम वाघमारे, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे यांच्यासह तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, तंत्र अधिकारी राहुल दिवाणे, सहायक कृषी अधिकारी राहुल सूर्यवंशी यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे, भुम तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे, परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांगडे, कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, धाराशिव व लोहारा तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, उमरगा तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे, तुळजापूर तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख या 8 तालुक्याच्या 7 कृषी अधिकारीसह मंडळ कृषी अधिकारी अणदूर काटकर, काटीचे नागटिळक, नळदुर्गचे एस जी देशमुख व तुळजापूर मंडळ कृषी अधिकारी भोसले या 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.











