कृषी विभागाचा फंडा, भ्रष्टाचार करा, वसुलीची रक्कम भरा – अनेक अधिकारी ‘लाभार्थी’
धाराशिव – समय सारथी
शासनाची फसवणूक करून आगाऊ वेतन उचलल्या प्रकरणी भूम कृषी कार्यालयातील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी तथा सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह 4 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला तात्काळ उत्तर न दिल्यास त्यांची चौकशी करून पुढील कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर वारे यांनी कृषी आयुक्ताकडे तक्रार केली होती त्यानंतर चौकशीला गती आली आहे. कृषी विभागात नवा फंडा सध्या सुरु असुन भ्रष्टाचार करा, पकडले गेल्यास वसुलीची रक्कम भरा आणि मोकळे व्हा.. या शुद्धीकरण योजनेचे अनेक अधिकारी व कर्मचारी धाराशिव जिल्ह्यात लाभार्थी बनले असुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी हे कृषी विभागाचे घोषवाक्य असले तरी काही भ्रष्ट अधिकारीमुळे शाश्वत नौकरी, समृद्ध अधिकारी असे बनत चालले आहे.
भूम येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कार्यालयीन कृषी अधिकारी विवेक गुडूप, लिपिक अमोल बिराजदार, सहाय्यक कृषी अधिकारी संतोष राठोड यांनी संगनमत करून 20 लाख 67 हजार 520 रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर वारे यांनी कृषी आयुक्त यांच्याकडे दाखल केली होती. त्या अनुषंगाने विभागीय सहसंचालक लातूर यांनी चौकशी करून तो अहवाल कृषी आयुक्ताकडे सादर केला होता.
अहवालानुसार भोसले व गुडूप हे कलास वन अधिकारी असल्याने त्यांच्यावर शासन स्तरावरून कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाकडून त्यांना 6 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये विवेक गुडूप याने 1 लाख रुपये, संतोष राठोड याने 3 लाख 24 हजार 510 रुपये, अमोल बिराजदार याने 16 लाख 43 हजार रुपये वेतन आगाऊ उचलले असल्याचे निदर्शनास आले होते.
तक्रारदार वारे यांनी तक्रार केल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांनी ती आगाऊ रक्कम शासन दरबारी जमा केली. त्यामध्ये अमोल बिराजदार याने जादाच्या घेतलेल्या वेतनामध्ये घाई गडबडीत 1 हजार 446 रुपये आगाऊ रकमेचे चलन शासन दरबारी भरल्याचेही निदर्शनास आले आहे. शासनाच्या या नोटीस नंतर हे सर्व कर्मचारी काय उत्तर देतात ? व संबंधित विभाग यांच्यावर काय कारवाई करतो? याकडे लक्ष वेधले आहे.












