धाराशिव – समय सारथी
भेसळीविरोधात सुरू असलेल्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भूम शहरात धडक कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवलेली तब्बल 1 हजार 125 किलो दूध पावडर जप्त केली. या कारवाईत 61 बॅगमधील सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
भूम शहरातील बाळासाहेब घोडके यांच्याकडे ही दूध पावडर विनापरवाना साठवून ठेवण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून हा साठा जप्त केला. या कारवाईची माहिती समोर येताच संपूर्ण भूम तालुक्यात एकच खळबळ उडाली. भूम तालुका हा दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, येथील खवा, पेढा व अन्य दुग्धजन्य पदार्थांची विक्री राज्यासह देशातील विविध भागात केली जाते. अनेक धार्मिक स्थळांवरही भूम तालुक्यातील खवा व पेढयाला मोठी मागणी आहे.
दुधामध्ये कृत्रिमरीत्या गुणवत्ता वाढविण्यासाठी किंवा उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यासाठी दूध पावडरचा वापर केला जातो. अशा भेसळीमुळे लहान मुले, वृद्ध तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळखोरांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.











