धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाची सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असुन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सचिव संजय मोरे यांनी कार्यकारणी बरखास्त केली आहे. शिवसेना, युवासेना, महिलासेना आणि अंगीकृत सर्व संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 2 दिवसापुर्वी प्रभारी जिल्हाध्यक्ष अजित पिंगळे यांनी धाराशिव शहरातील काही पदाधिकारी यांच्या निवडी केल्या होत्या त्यानंतर काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.
पिंगळे व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मधुर संबंधावर अनेक वेळा शिवसैनिकांनी आरोप केले होते. आमदार पाटील शिवसेना शिंदे गट चालवीत असल्याचा व त्यांच्या मर्जीनुसार जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे एबी फॉर्म व उमेदवार दिल्याचा आरोप झाला होता.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.












