धाराशिव – समय सारथी
शिवसेना वर्धापन दिनी शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने दक्षता घ्यावी असे पत्र गुन्हे अनवेशन विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ प्रवीण मुंढे यांनी बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त यांना दिले आहे. त्यात संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे व संजय दिना पाटील यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाची व निषेध आंदोलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे व शिवसेना ठाकरे गटाचा 60 वा वर्धापन दिन 19 जुन रोजी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन नेस्को, गोरेगाव, मुंबई येथे होणार आहे. त्यात वर्धापन दिन कार्यक्रमात 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर शिवसेना ठाकरे गटाचा देखील मेळावा षडमुखानंद हॉल, सायन, मुंबई येथे आयोजित केला असुन राज्यभरातून शिवसेना ठाकरे गटाचे व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखिल हजर राहणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नेस्को, गोरेगाव येथे होणा-या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा दरम्यान अचानक निषेध आंदोलन करण्याची शक्यता आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाचे इतर मंत्री यांच्या मुंबई व राज्यभर पार पडणारया दौऱ्या दरम्यान ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून निषेधात्मक आंदोलन करण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाकडुन आनंदोत्सव साजरा केला जाण्याची शक्यता असुन त्यादरम्यान शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट समोरा समोर येऊन आपापसात वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दोन्ही गटाचे आक्रमक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवर निगराणी ठेवून त्यांच्या प्रतिक्रिया, हालचालीवर लक्ष ठेवून सतर्कता बाळगावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे पत्र दिले आहे.











