6 हजार बोगस मतदार नोंदणी अर्ज – तुळजापूर विधानसभेतील प्रकार, निरंतर पत्रव्यवहार
धाराशिव – समय सारथी
बोगस आधारकार्ड, मोबाईल नंबर आधारे 6 हजार पेक्षा अधिक बोगस मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न तुळजापूर विधानसभा मतदार संघात झाला, खुद्द निवडणुक आयोगाने फसवणूक व तोतयेगिरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून दीड वर्ष उलटले तरी मुख्य आरोपी व मास्टर माईंड कोण ? याचा तपास लागला नाही. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व राज्य निवडणुक आयोग असा हा तिहेरी पत्र व्यवहार सुरूच आहे.
पोलिसांनी सीडीआर व एसडीआर जमा केले मात्र कोणतीच ठोस माहिती पुरावे मिळाले नाहीत, नाव नोंदणी केलेली लोक प्रत्यक्ष पत्त्यावर राहत नसल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल नंबर हीच ती काय ओळख, पोलिसांना तपासासाठी त्यांनी ज्या ऍपवरून नोंदणी केली त्याचे आयपी ऍड्रेस हवे आहेत, ते मिळवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निवडणुक आयोगाला. तपास होत नसल्याने जिल्हा प्रशासन पोलिसांना पत्र देते की तपासाचे काय झाले त्यावर पोलिस पुन्हा आयपी ऍड्रेस द्या असे पत्र देतात. एकंदरीत आयपी ऍड्रेसवर घोडे आडले असुन निरंतर पत्रव्यवहार सुरु आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख हे तपास करीत आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी 476/ 2024 ला बोगस आधार कार्ड, फोटो, नावे व कागदपत्रे जोडून बोगस मतदार नोंदणी अर्ज दाखल केल्या प्रकरणी 40 जणांवर सायबर पोलिसात गुन्हा नोंद केला. तुळजापूर विधानसभा मतदार संघातील 294 मतदान केंद्रावर मतदार याद्याच्या चावडी वाचनात उघड झाला. भारतीय न्यायसंहिता कलम 172,3(5),318(2),335,336(2),336(3),340(2)61(2) व 62 अन्वये गुन्हा नोंद केला.
‘व्होटर हेल्पलाईन’ या अँपच्या माध्यमातुन 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात जवळपास 294 मतदान केंद्रावर 6 हजार 95 पेक्षा अधिकची नावे फॉर्म नंबर 6 भरून नाव नोंदणी करण्यात आली मात्र त्यातील बोगसपणा उघड झाल्यावर हे अर्ज नाकारण्यात आले. एका लॉगिनवरून जास्तीत जास्त 5 अर्ज ऑनलाईन भरता येतात म्हणजे जवळपास दीड हजार सिमकार्ड वापरण्यात आले त्यातुन एकाही व्यक्तीपर्यंत पोलिसांना पोहचता आले नाही.
तुळजापूर मतदार संघात हंगरगा, रुईभर व सिंदफळ, काटीसह इतर गावातील कनेक्शन सेम असुन आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सर्वत्र वापरले गेले. आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी,ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला होता. विशेष म्हणजे बोगस नोंदणी अर्ज दाखल केलेले पैकी काहीजण परप्रांतीय असल्याचे सत्यपाल, कपूर,अय्यर,खंडेलवाल या आडनावावरून दिसते.
फोटो एकच मात्र नाव व आधार क्रमांक वेगवेगळे वापरण्यात आले आहेत. एक मुलीचा फोटो एकच आहे मात्र एका आधार कार्डवर छाया सुनील पवार, बेंबळी गावचा पत्ता तर दुसऱ्यावर पुनम चव्हाण आरळी खुर्द तुळजापूर येथील पत्ता आहे. हा दोन्ही आधार कार्डचे नंबर वेगवेगळे असले तरी एनरोल नामांकन नंबर हा 4892/89659/414 हा सारखाच आहे. हाच एनरोल नंबर जवळपास हजारो आधार क्रमांक यांना वापरला आहे. आधार नंबर वेगवेगळे असुन ते अस्तित्वात नाहीत. सर्व आधार कार्डवरील दिनांक 23 मे 2019 असुन डाउनलोड व जारी केलेली दिनांक एकच आहे.











