धाराशिव – समय सारथी
तुळजापूरचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असुन त्यांची रवानगी हर्सूल येथील जेलमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय कार्यालयात घुसून तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांना 1 वर्ष कारावास व 15 हजाराचा दंड ठोठावला आहे.
तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यालयात जाऊन मृत्यू प्रमाणपत्र व ठेकेदारीचे बील यावरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यात त्यांना धाराशिव कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी कलम 332 साठी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड तर कलमं 504 साठी 3 महिने शिक्षा व 5 हजार दंड ठोठावला होता, शिक्षेनंतर जामीन मिळाल्यानंतर रोचकरी यांनी जानेवारी 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील केले होते मात्र कोर्टाने शिक्षा कायम ठेवली आहे.
राजकीय गटबाजी व द्वेषातुन हा गुन्हा नोंद केला असुन अनेक साक्षी, पुरावे व प्रत्यक्षदर्शी व पंच यांचे जबाब एकमेकांशी जुळत नसुन त्यात ताफावत आहे, पुरावे विश्वाहार्य नाहीत, अशी बाजु रोचकरी यांच्या वकिलांनी कोर्टात मांडली. योग्य पुरावे असुन वैद्यकीय पुरावे त्याला जुळत आहेत, त्यामुळे अपील फेटाळावे अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. जावळे व डॉ मुस्तफा पल्ला यांची साक्ष व वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. रोचकरी यांची गुन्ह्याची जंत्री मोठी असुन त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. हद्दपारीसह गुन्हे नोंद असुन दहशतीचा इतिहास आहे.
धाराशिव येथील तत्कालीन विशेष न्यायाधीश एस आय पठाण यांनी दिलेला निकाल योग्य असुन तो कोर्टाने कायम ठेवत अपील फेटाळून लावले आहे. देवानंद रोचकरी यांच्या विरोधात दोषसिद्धी झाल्याने शिक्षा भोगण्यासाठी वॉरंट काढले आहे त्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. रोचकरी यांच्या बाजुने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड पी आर कटनेश्वरकर यांनी तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍड एस बी जाधव यांनी सक्षमपणे बाजु मांडली. जिल्हा कोर्टाने अप्पासाहेब हरिभाऊ रोचकरी व सुनील उर्फ पिटू संभाजी रोचकरी यांना 15 हजार दंड ठोठावला होता, तो उच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.












