धाराशिव – समय सारथी
तुळजापूरचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांच्या अडचणीत वाढ झाली असुन शासकीय कार्यालयात घुसून तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने शिक्षा व दंड सुनावला आहे. कलम 332 अंतर्गत त्यांना कोर्टाने दोषी ठरवले असुन 1 वर्ष कारावासाची शिक्षा व 15 हजार रुपये दंड ठोठावला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कलमातुन निर्दोष मुक्तता केली असुन फिर्यादी जावळे यांना 10 हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी दिले आहेत.
तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यालयात जाऊन मृत्यू प्रमाणपत्र व ठेकेदारीचे बील यावरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यात त्यांना धाराशिव कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी कलम 332 साठी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड तर कलमं 504 साठी 3 महिने शिक्षा व 5 हजार दंड ठोठावला होता, शिक्षेनंतर जामीन मिळाल्यानंतर रोचकरी यांनी जानेवारी 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील केले होते मात्र कोर्टाने शिक्षा कायम ठेवली आहे.
राजकीय गटबाजी व द्वेषातुन हा गुन्हा नोंद केला असुन अनेक साक्षी, पुरावे व प्रत्यक्षदर्शी व पंच यांचे जबाब एकमेकांशी जुळत नसुन त्यात ताफावत आहे, पुरावे विश्वाहार्य नाहीत, अशी बाजु रोचकरी यांच्या वकिलांनी कोर्टात मांडली. योग्य पुरावे असुन वैद्यकीय पुरावे त्याला जुळत आहेत, त्यामुळे अपील फेटाळावे अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. जावळे व डॉ मुस्तफा पल्ला यांची साक्ष व वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. रोचकरी यांची गुन्ह्याची जंत्री मोठी असुन त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. हद्दपारीसह गुन्हे नोंद असुन दहशतीचा इतिहास आहे.
धाराशिव येथील तत्कालीन विशेष न्यायाधीश एस आय पठाण यांनी दिलेला निकाल योग्य असुन तो कोर्टाने कायम ठेवत अपील फेटाळून लावले आहे. देवानंद रोचकरी यांच्या विरोधात दोषसिद्धी झाल्याने शिक्षा भोगण्यासाठी वॉरंट काढले आहे त्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. रोचकरी यांच्या बाजुने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड पी आर कटनेश्वरकर यांनी तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ऍड एस बी जाधव यांनी सक्षमपणे बाजु मांडली. जिल्हा कोर्टाने अप्पासाहेब हरिभाऊ रोचकरी व सुनील उर्फ पिटू संभाजी रोचकरी यांना 15 हजार दंड ठोठावला होता.
मंकावती तीर्थकुंड हडप करण्याचा डाव – गुन्हा नोंद, न्यायप्रविष्ट
देवानंद रोचकरी यांच्यावर तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराचे मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे अश्याच कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद असून ते जामीनावर आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने चौकशी अंती हा गुन्हा 10 ऑगस्ट 21 रोजी नोंद झाला. तुळजापूरचे तत्कालीन तहसीलदार सौदागर तांदळे,नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख उप अधीक्षक वैशाली गवईच्या त्रिसदस्य समितीने चौकशी अहवाल दिला होता.
तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या गुन्हे नोंद करण्याच्या आदेशाला स्थगिती दिल्यावर रोचकरी यांनी फटाके वाजवून जल्लोष केला, पत्रकारांना धमक्या दिल्या गेल्या. फौजदारी प्रक्रियेला मंत्री शिंदे यांनी स्थगिती दिल्याने अनेक कायदेशीर बाबी व पेच निर्माण झाल्यावर शिंदे यांनी स्वतःच्या आदेशाला स्थगिती दिली व गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने रोचकरी यांना मुंबई मंत्रालय परिसरातून अटक झाल्यानंतर ते 2 महिने धाराशिव जेलमध्ये होते, जिल्हा कोर्टाने तत्कालीन जिल्हा सरकारी वकील ऍड शरद जाधवर यांचा युक्तिवादानंतर जामीन नाकारला. उच्च न्यायालयात त्यांना जामीन मिळाला होता.
मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे. मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा त्यांनी केला होता. मंकावतीराव रोचकरी यांचे नावाने ‘मंकावती कुंड’ असून वडिलोपार्जित मालमत्ता पुरातन काळातील असून सातव्या पिढीची या कुंडावर मालकी आहे, असा दावा होता मात्र तो फेटाळून गुन्हा नोंद झाला.












