धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिसांनी तामलवाडी येथे मिलन लॉजवर धाड मारून वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या 3 पीडित महिलांची सुटका केली, यातील 2 महिला ह्या बांगलादेशी असल्याने यांचे गांभीर्य वाढले आहे. धाराशिव सारख्या ग्रामीण भागापर्यंत बांगलादेशी महिला सेक्स रॅकेटसाठी वापरल्या जात असुन त्या इथपर्यंत कोणामार्फत आल्या याचा तपास सुरु आहे.
मिलन लॉज सील करून संपत्ती जप्तीसह इतर कारवाई होणार का ? हे पाहावे लागेल. स्थानिक भागीदार व वसुलीदार कोण ? या व्यवसायाला वरदहस्त व अभय कोणाचे ? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. तामलवाडी येथील एक गावपुढारी याच्या आशीर्वादामुळे हा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याची माहिती आहे. या साखळीतील दलाल व लॉजवर आलेल्या लोकांची नावे तपासली जात असुन ते कारवाईच्या रडारवर आहेत.
तामलवाडी येथील मिलन लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी छापा टाकून 3 पिडीत महिलांची सुटका केली. दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे (वय 43, रा. अविनाश नगर, एमआयडीसी सोलापूर) व संतोष नामदेव पवार (वय 40, रा. तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर) या दोघांना अटक केली आहे, त्यांना कोर्टाने पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिसांनी मोबाईल, पिग्मी पासबुक, नोंदीचे रजिस्टर, यूपीआय स्कॅनर मशीन, लॉजचा परवाना फॉर्म रोख रक्कम जप्त केली आहे. तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 143, 144, 3(5) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 अन्वये गुरनं 60/2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












