धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धाराशिवहून परंड्याकडे जात असताना आंदोलकांनी योगेश कदम यांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एकेरी भाषेत बोलणे सहन केले जाणार नाही,” असा इशारा योगेश कदम यांनी दिल्यानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी कदम यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
मराठा आंदोलक अमोल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानकपणे योगेश कदम यांच्याकडे समोरीत ताफा अडवला व अंतरवाली मराठी येथील आंदोलनादरम्यान तसेच मराठा आंदोलन वरील गुन्हे मागे का घेत नाहीत याबाबत योगेश कदम यांना जाब विचारण्यात आला यावेळी योगेश कदम यांच्यासोबत खासदार ओमराजे यांचे बंधू डॉ जयप्रकाश राजे निंबाळकर, सुधीर पाटील यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
अचानकपणे आंदोलकांनी ताफा अडवल्याने काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.












