उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या विरोधात महसुलचे कामबंद आंदोलन सुरु
धाराशिव – समय सारथी
उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी दप्तर तपासणीच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप तहसीलदार मृणाल जाधव यांनी केला होता, हे प्रकरण जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी विशाखा समितीकडे चौकशीसाठी पाठवले आहे. येत्या 3-4 दिवसात ही समिती दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करेल त्यानंतर निर्णय घेऊन कारवाईची दिशा ठरवली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी सांगितले. डव्हळे यांनी महिला अधिकारी यांचा जाणीवपूर्वक अपमान व मानसिक त्रास दिल्याचा आरोप तहसीलदार मृणाल जाधव व इतर कर्मचारी यांनी केला आहे त्या अनुषंगाने चौकशी होणार आहे. जिल्ह्यातील तहसीलदार व कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
आमचा दप्तर तपासणी किंवा इतर बाबींना कोणताही विरोध नाही, ती प्रशासकीय बाब आहे मात्र ज्या पद्धतीने डव्हळे यांनी अपमानस्पद वागणूक दिली त्याला विरोध आहे. कोणत्या व्यक्तीला नव्हे प्रवृत्तीला विरोध आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिली. ज्या मुद्यावर आक्षेप घेण्यात आला आहे त्यावर कर्मचारी खुलासा, कागदपत्रे देत असतानाही त्यांना धमकावण्यात आले व कारवाईची भीती घालण्यात आली हे चुकीचे आहे. कोणतेही चुकीचे काम केले नसुन जिल्हाधिकारी यांनी इतर अधिकारी मार्फत शहानिशा करावी असे तहसीलदार जाधव म्हणाल्या.
तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी करण्यात आली होती त्यात कोणतेही चुकीचे केले नाही, वस्तूस्तिथी जी असेल तसा अहवाल जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल, ज्यांनी चुकीचे केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे डव्हळे म्हणाले आहेत.
उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचेकडून तपासणीवेळी अपमानास्पद वागणूक दिली, एसीबी कारवाईची धमकी देण्यात आली. कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कर्मचारी दहशतीमध्ये व मानसिक त्रासामध्ये आहेत. त्यामुळे याचा कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे असा आरोप अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. डव्हळे यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी अथवा आमच्या अधिकारी व कर्मचारी यांची बदली अन्य ठिकाणी बदली करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.