जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांचा पुढाकार, रुपडे बदलणार
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर व परिसराच्या विकासासाठी 54 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असुन पुरातत्व विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे. तुळजाभवानी मंदीर या राज्य संरक्षित मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी विविध कामे करण्यात येणार असुन यामुळे मंदिराचे पुरातन रूप कायम राहून रुपडे बदलणार आहे. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांच्या पुढाकाराने मंदीर परिसरात ही विकासकामे व आराखडा मंजुर करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे 6 भाग म्हणजे टप्पे करण्यात आले आहेत त्यात पहिला भागात भुयारी मार्ग,यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदीर जतन व दुरुस्ती हे 11 कोटी 36 लाखांचे काम आहे. दुसरा भागात कार्यलयीन, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी,खुला प्रेक्षक मंच, गोमूख तीर्थ, दत्त मंदीर, मातंगी मंदीर,कल्लोळ तीर्थ, निंबाळकर महाद्वार,मार्तंड ऋषी मंदीर, टोळ भैरव मंदीर, दीप माळ, शिवाजी महाद्वार व ओवऱ्या,खंडोबा व यमाई मंदीर जतन व दुरुस्ती अशी 12 कोटी 9 लाखांची कामे आहेत.
तिसरा भागात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 46 लाखांची कामे आहेत. चौथा भागात महंत तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या,आराध्य खोलीवरील ओव्हऱ्या, आराध्य खोली दगडी फरशी जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 45 लाखांची कामे आहेत.
पाचवा भागात मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वार जतन व दुरुस्तीचे 7 कोटी 21 लाख आणि सहावा भागात लिफ्ट व रॅम्पचे 4 कोटी 25 लाख असे 53 कोटी 84 लाख 47 हजार 7 रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. संभाजीनगर पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे यांनी तसा प्रस्ताव पाठवला होता. मंदीरमधील 6 भाग पैकी 1,2,3 व 5 यातील नमुद समाविष्ट कामाची निविदा पुरात्तव विभागाने काढली असुन 29 ऑगस्टपर्यंत निविदा भरता येणार आहे त्यानंतर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
तुळजाभवानी मंदिराचे जतन व दुरुस्ती करताना जुने रूप कायम ठेवले जाणार असुन सर्व कामे पुरात्तव विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी सांगितले.या कामामुळे मंदीर व तुळजापूरच्या वैभवात भर पडणार असुन पर्यटनाला चालना मिळणार आहे शिवाय नवरात्र, गर्दीच्या दिवशी व्यवस्था करता येणार आहे.