धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तथा ‘मित्रा’ उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिहं परदेशी हे 20 मार्च रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. परदेशी हे गेल्या काही महिन्यापासून धाराशिव जिल्हा, औसा, बार्शी येथे सक्रीय झाले आहेत, त्यांच्या नावाची लोकसभा मतदार संघांसाठी भाजपकडुन चाचपणी सुरु आहे.
धाराशिव लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांचे एकप्रकारे राजकीय लॉंचिंग व चाचपणी भाजपकडून केली जात आहे. राजकीय नेत्या ऐवजी सेवानिवृत्त अधिकारी या पर्यायाची चाचपणी या माध्यमातून भाजपकडुन केली जात आहे. मोदी यांनी अश्विनी वैष्णव, एस सुब्रह्मण्यम यासारख्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट केंद्रीय मंत्री केल्याचा दाखला देत मोबाईल फोन द्वारे फोन करुन सर्वेक्षण केले गेले होते.
परदेशी यांचा धाराशिव लोकसभेचा वाढता जनसंपर्क –
परदेशी हे भूकंप काळात लातूरचे जिल्हाधिकारी होते. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असुन त्याचा आधार घेत विविध शासकीय योजना अंमलबजावणीसाठी त्यांचा धाराशिव जिल्ह्यातील वावर वाढला आहे. प्रशासकीय बैठका, महिला मेळावे, आढावा बैठक तसेच गाठीभेटी यावर भर दिला आहे. कृष्णा खोरे पाणी, धाराशिव जिल्हा रुग्णालय, सोलर प्रकल्प, टेक्निकल टेक्स्टईल पार्क या विषयावर मार्ग काढण्यात परदेशी यांचा सहभाग दिसून येत आहे.
परदेशी यांचा कार्यकाळ व ओळख –
63 वर्षीय प्रवीण परदेशी हे 1985 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी असुन सध्या ते निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात सुरु असलेल्या ‘मित्रा’ उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.फडणवीस यांचे ते अत्यंत जवळीक व विश्वासू म्हणून ओळखले जातात.
तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहिला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे ते अधिकारी असुन मुख्य सचिव पदाने हुलकावणी दिल्याने ते केंद्रात जाऊन सेवानिवृत्त झाले. मित्रा उपक्रमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी 3 वर्षासाठी त्यांची नेमणूक केली आहे.
लातूर येथील 1993 मधील भूकंप काळात ते जिल्हाधिकारी होते, भूकंपातील पुनर्वसन व जागतिक बँकेकडून मिळालेली मदत यात त्यांचा मोठा वाटा आह. अर्थशास्त्र व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिकस येथे त्यांनी सामाजिक निती, भागीदारी योजना व आर्थिक विकास या विषयात मास्टरेट केली आहे. पनवेल, रायगड अमरावती, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई या ठिकाणासह त्यांनी वन पर्यावरण, वित्त, शहर विकास, महसूल विभागात व परदेशात 36 वर्ष सेवा केली आहे.भूकंप, केरळ आपत्ती, कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे
धाराशिव लोकसभा =
धाराशिव लोकसभा मतदार संघात धाराशिव, उमरगा, तुळजापूर, भुम या धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्हातील बार्शी असे 6 मतदार संघ येतात. जागा वाटपात महायुती (शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, भाजप) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना ठाकरे गट) यांच्यात रस्सी खेच आहे.सध्या शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार आहेत