पुणे – समय सारथी
संपूर्ण राज्यभरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’स प्रारंभ करण्यात आला असून या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कात्रज येथे शासकीय पोलिओ लसीकरण केंद्रावर लहान मुलांना आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पोलिओ डोस देत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
पोलिओ मुक्त भारत आज अस्तित्वात असला, तरी भविष्यात देखील आपला देश पोलिओ मुक्तच रहावा यासाठी राज्यातील प्रत्येक ५ वर्षाखालील बालकाला पोलिओ डोस मिळणे गरजेचे असून एक जबाबदार नागरिक व सुजाण पालक या नात्याने प्रत्येकाने यासंबंधी जागरूकता बाळगून बालकांना पोलिओ डोस देणे गरजेचे आहे असे मंत्री सावंत म्हणाले.
कात्रज येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करत उपस्थित बालकांना मी स्वतः पोलिओ डोस दिला ही बाब आनंद देणारी असून राज्यभरात उपलब्ध असलेल्या सर्व ठिकाणी बालकांचे लसीकरण करावे असे आवाहन आरोग्यमंत्री सावंत यांनी केले.