धाराशिव – समय सारथी
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 2 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार याबाबतचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिले असुन अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
राजेश्वरी बाबुराव भूताळे (जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, काक्रंबा) आणि एम एम सालपे (जि.प. प्राथमिक शाळा, भोईटे वस्ती, किलज) या 2 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी वारंवार बैठका, दूरध्वनीद्वारे सूचना आणि मार्गदर्शन करूनही संबंधित बीएलओ यांनी मतदारांचे मॅपिंग, गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन तसेच ॲपवर माहितीचे डिजिटायझेशन ही कामे पूर्ण केली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भुताळे यांनी केवळ 21.17 टक्के एवढेच काम केले. कामाची गती वाढवण्याबाबत त्यांना अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार, निवडणूक श्रीमती एस. एस. माजलगावकर यांनी दुरध्वनी केला असता त्यांनी माजलगावकर यांना “मी आत्महत्या करीन” अशी धमकी देऊन मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षणाच्या कामात अडथळा निर्माण केला असा ठपका ठेवला आहे तर सालपे यांनी केवळ 7 टक्के काम केले.
निवडणूक विषयक कामे ही लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 13 CC अंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा कामात झालेला हलगर्जीपणा आणि असहकार्य हे शासकीय शिस्तीचा भंग करणारे असून गंभीर स्वरूपाचे आहे. दोन्ही शिक्षकांना सेवेतून तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन त्याचा अहवाल त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.











