धाराशिव – समय सारथी
जिल्हा व तालुक्याचे नाव धाराशिव झाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ हेच नाव लोकसभेप्रमाणे कायम असणार आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ हे नाव निवडणुकीत वापरले जाणार आहे.
परिसिमन आयोगाच्या नियमानुसार 2026 नंतर जनगणना होणार असुन त्यानंतर मतदार संघ नाव व पुनररचना होणार आहे. त्यामुळे 2026 पुर्वी मतदार संघाचे नाव जैसे थेच राहणार आहे. या नियमामुळे उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले असले तरी निवडणुकीत मात्र उस्मानाबाद असेच म्हणावे लागेल. हाच नियम औरंगाबाद, संभाजीनगरसाठी लागु असणार आहे.
15 सप्टेंबर 2023 च्या अद्यादेशानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे व विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे करण्यात आले होते. परिसीमन कायद्याच्या तरतुदीनुसार लोकसभा व विधानसभा मतदार संघांचे नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव 28 नोव्हेंबर 23 रोजी भारत निवडणुक आयोगाकडे पाठवला होता.
भारत निवडणुक आयोगाने 5 जानेवारी 24 रोजीच्या पत्रानुसार राज्यामध्ये प्रशासकीय भाग तयार करणे, त्यामध्ये सुधारणा व नावामध्ये बदल करणे हे राज्य सरकारद्वारा आवश्यकतेनुसार वेळोवेळी करण्यात आलेली नियमित प्रक्रिया असते असे कळविले आहे.लोकसभा, विधानसभा मतदार संघांचे नाव व्याप्ती त्यावेळी स्थापित करण्यात आलेल्या परीसीमन आयोगाने निश्चित केलेली आहे त्यामुळे लोकसभा, विधानसभा व विधान परिषद मतदार संघाच्या नावामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले व उस्मानाबाद नाव कायम ठेवले आहे.