धाराशिव – समय सारथी
न्याय व्यवस्थेवर विश्वास असुन गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेल्या कायदेशीर संघर्षास न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल 16 जुन रोजी लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या वडिलांची हत्या कोण व का केली हे सीबीआय तपासात उघड झाले असुन दोषींना कोर्ट योग्य शिक्षा ठोठावेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्या राजकीय हेतुसाठी हत्या करण्यात आली तो हेतु या जन्मात तरी साध्य होऊ देणार नाही असे ते म्हणाले. पवनराजेंची हत्या केली असली तरी त्यांचे विचार अजुनही आमच्यासोबत आहेत, त्यांचे कार्य व त्यांनी सुरु केलेला लढा अद्याप संपलेला नाही, त्यांचा विचार आणि संघर्षाचा वारसा पुढे चालवत आहोत. काही गोष्टी पचवण्यासाठी विकासाच्या गोंडस नावाखाली राष्ट्रवादी सोडून भाजपात पक्षांतर करावे लागले यातच जनतेला सर्व काही कळाले, निकालानंतर योग्य वेळी अनेक बाबीवर सविस्तर बोलेन असे ओमराजे म्हणाले.
2006 साली पवनराजे यांची हत्या झाल्यापासुनचा कायदेशीर व राजकीय संघर्ष आजही सुरु आहे. 20 वर्षानंतर कोर्ट योग्य तो निर्णय देऊन न्याय देईल असे ते म्हणाले. 16 जुनला कोर्ट निकाल देणार असल्याने त्या दिवशी मी स्वतः मुबंई कोर्टात हजर राहणार आहे. माझी आई आनंदीदेवी, बंधू डॉ जयप्रकाश राजे हे या खटल्यात गेली 20 वर्षांपासून न चुकता हजर राहत कायदेशीर लढा देत आहेत, दुसरीकडे डॉ पाटील यांच्यासह काही आरोपी कोर्टात वैद्यकीय कारण देतात व बाहेर खुलेआम फिरत पळवाटा काढतात.
सख्या चुलत भावाची हत्या केल्याची अपराधीपणाची भावना डॉ पाटील यांच्यात नाही, उलट पैशाची व सत्तेची मस्ती आहे. सत्तेच्या आड येणाऱ्याचा कट रचून सुपारी देऊन शांत डोक्याने हत्या करायची, माणूसच संपवायचा ही क्रूर मानसिकता आहे. जी कृती केली त्याचा न्याय मिळावा व भविष्यात अश्या स्वरूपाचे कृत्य कोणीही करू नये, हा संदेश समाजात जावा हा आमचा हेतू आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये यासाठी चालक समद काझी याची सुद्धा निर्घृण हत्या केली, त्यांचा यात काय दोष होता. सत्तेसाठी 2 कुटुंब उघड्यावर आणत पित्याचे छत्र हिरावुन घेत पोरके केले, याचा न्याय नक्की मिळेल असे ते म्हणाले.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असुन त्याच्या कबुली जबाब भोवती हे संपुर्ण प्रकरण आहे. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. महाराष्ट्र पोलिस, सीआयडी व त्यानंतर सीबीआय अश्या 3 तपास यंत्रणानी याचा तपास केला असुन अण्णा हजारे हत्येची सुपारी व कट याच तपासात उघड झाला.











