धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी 50 नवीन बसेसची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला करीत मोठी भेट दिली. पालकमंत्री सरनाईक यांनी पहिल्याच दौऱ्यात कर्तव्य म्हणुन जिल्ह्याला नवीन बसेसची भेट दिली. पत्रकारांच्या वतीने मंत्री सरनाईक यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री सरनाईक यांनी पत्रकारांसमवेत संवाद साधत जिल्ह्यातील अडीअडचणींची माहिती घेत बातचीत केली. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे, शिवसेना नेते सुधीर अण्णा पाटील, जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, जिल्हा सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे, शिवसेनेचे युवा राज्य प्रमुख नितीन लांडगे, आनंद पाटील, तालुका प्रमुख अजित लाकाळ आदींसह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
एसटी महामंडळाला दर दिवसाला तीन कोटी रुपयांचे नुकसान होत आहे तर आजघडीला एसटी महामंडळाकडे 14 हजार 300 बसेस आहेत त्यापैकी 30 ते 40 टक्के बसेस खराब असुन शकतात त्यामुळे प्रवाशांना सेवा देण्यासाठी दर वर्षाला नवीन पाच हजार बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. या माध्यमातूनच राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक डोंगर दऱ्यातील वाडी, वस्ती व गावात बस सेवा सुरू करणार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यापुढे एकही बस भाडेतत्त्वावर घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ठेकेदारांच्या भल्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या घ्यायच्याच नाहीत असा ठाम निर्धार राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांना काहीतरी चांगले दिवस येतील यासाठी काम करणार असून एसटी महामंडळाची परिस्थिती बदलली पाहिजे. एकीकडे महिलांना बसमध्ये निम्म्या तिकिटाची सुविधा तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मोफत सुविधा दिलेली आहे. त्याचा भार देखील एसटी महामंडळावर पडत आहे. त्यामुळे भाडेवाढ करणे आवश्यक असल्याचे सांगत ही भाडेवाढ मागील तीन वर्षांत करणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ती केली नव्हती. त्यामुळे ती आता पंधरा टक्क्याने केली आहे. मात्र ही भाडेवाढ करताना मला देखील माहित नव्हते असे सांगत एसटी महामंडळात अंतर्गत प्राधिकरण असून या प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांना काही अधिकार असतात. त्या अधिकारांमध्ये त्यांनी ही भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला ही बाब समजल्याचा खुलासा त्यांनी केला. विशेष म्हणजे घरातील महिलांना एसटीच्या सुविधा आहेत. तर पुरुषांसाठी भाडेवाढ असली तरी त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे असे सांगत या भाडेवाडीचे त्यांनी जोरदारपणे समर्थन केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. त्या सुविधा कोणत्याही परिस्थितीत बंद केल्या जाणार नाहीत. त्या आहे तशाच पूर्ववत ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गाव तेथे एसटी हे एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य असून ते ब्रीदवाक्य वास्तवात उतरविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे राज्यातील इतर सर्व विभागांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत आहे. कारण या महामंडळाच्या मालकीच्या 33 हजार 340 एकर जमीन म्हणजेच जागा या शहराच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत. जिथे रेल्वे स्थानके आहेत, अगदी त्यांच्यासमोरच या महामंडळाच्या जागा आहेत.
राज्यातील अनेक बस स्थानके मोडकळीस आलेले आहेत. तर काही ठिकाणच्या मस्त बस स्थानकांची दुरावस्था झालेली आहे. बारामती येथील बस स्थानक हे अत्यंत चांगले आहे. त्यामुळे अनेकजण बारामतीचे बस स्थानक चांगले आहे. आमचे केव्हा होईल ? असे प्रश्न विचारतात. त्यामुळे राज्यातील सर्वच बस स्थानके सर्व सुविधांनी युक्त करण्यासाठी मी कर्नाटक राज्यातील बस स्थानकांची पाहणी करण्यासाठी दौरा करणार आहे. त्या पाहणीनंतर महाराष्ट्रातील बस स्थानके बारामती पेक्षा चांगले व दर्जेदार बनविण्यात येतील असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.
तुळजाभवानी मंदिरात काळानुरूप बदल करणार – पुजारी, स्थानिकांना विश्वासात घेणार
तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे नव्या रूपात अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्या मंदिरातील काही दगडांना चिरा गेलेले आहेत. तसेच दर्शन व्यवस्था व्यवस्थित व्हावी या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला असून या नवीन पद्धतीमध्ये चांगले बांधकाम केले जाईल. मात्र जुने जे आहे त्यात किंचित ही बदल केला जाणार नाही. तसेच तेथील विकास करण्यासाठी स्थानिक नागरिक व भाविकांच्या भावनेला ठेच पोचणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. विशेष म्हणजे नवीन पद्धतीने जो काय विकासात्मक बांधकाम केले जाईल ते पुढील किमान सातशे वर्षे टिकेल या दृष्टीने दर्जेदार कामे केली जातील असे त्यांनी नमूद केले. पुजारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन विकास करणार असल्याचे ते म्हणाले. घोडबंदर किल्ला १५ व्या शतकात बांधलेला आहे. तो माझ्या मतदारसंघात असून त्या किल्ल्याचे पुनर्जीवनच केलेले आहे. अगदी तसाच तुळजापूर येथील मंदिराचा विकास केला जाईल. त्यामध्ये काळानुरूप काही बदल करावेच लागतील असे सांगत ते म्हणाले की भाविकांच्या दृष्टीने व सर्व सोयी सुविधा युक्त असेच बदल केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले.